Join us

म्हणे, द. आफ्रिकेत नोकरी; २३ जणांना लाखोंचा गंडा, मालाड पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 12:23 IST

Mumbai Crime News: परदेशात नोकरीचे आमिष दाखवत जवळपास २३ जणांची फसवणूक करत एकूण १७.१० लाख रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार मालाडमध्ये घडला. याविरोधात पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे.

मुंबई -  परदेशात नोकरीचे आमिष दाखवत जवळपास २३ जणांची फसवणूक करत एकूण १७.१० लाख रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार मालाडमध्ये घडला. याविरोधात पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे.

तक्रारदार वीरेंद्र सिंह (वय ५१) यांनी ओमान, सौदी अरेबिया, अबुधाबी, कुवेत तसेच दोहा (कतार) याठिकाणी क्रेन ऑपरेटर म्हणून नोकरी केलेली आहे. तिथून ते २०२० मध्ये कोविडच्या साथीमध्ये मायदेशी परतले.  ते सध्या उत्तरप्रदेशमधील त्यांच्या गावात शेती करतात. त्यांना जानेवारी २०२४ मध्ये आयेशा प्लेसमेंट नामक कंपनीमधून अभिमन्यू सिंह नाव सांगणाऱ्या व्यक्तीचा फोन आला. ज्याने सिंह यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये नोकरी मिळेल असे म्हणत कागदपत्रे पाठवायला सांगितली. सर्व्हिस चार्ज आणि तिकिटाचे पैसे मिळून ७५ हजार रुपये खर्च येईल असेही कॉलर म्हणाला. त्यानुसार १८ फेब्रुवारीला सिंह यांनी आवश्यक कागदपत्रे कॉलरला व्हॉट्सॲप केली.

आरोपींनी त्यांना शेल ऑइल अँड गॅस कंपनीचे नियुक्तीपत्र पाठवत प्लेसमेंट कंपनीच्या खात्यात २० हजार रुपये पाठवायला सांगितले. २३ मार्च रोजीचे दक्षिण आफ्रिकेला जाण्याचे तिकीट बुक झाले असून तुम्ही मुंबईला या असेही भामटे म्हणाले. कांदिवलीच्या नातेवाईकाकडे उतरून सिंह नंतर मालाडमध्ये अभिमन्यूच्या ऑफिसला ते पोहोचले. तिथे त्यांचे तिकीट रद्द झाल्याचे सांगत पुढच्या महिन्याचे तिकीट बुक करतो, असे म्हणून त्यांच्याकडून आतापर्यंत ६५ हजार रुपये उकळले. मात्र, त्यांना कोणतीही नोकरी दिली नाही आणि आरोपींनी आपले फोनही बंद केले.

बनावट व्हिसा, विमान तिकीटआरोपींनी तक्रारदारांना बनावट व्हिसा व विमान तिकीट देत त्यांच्याकडून पैसे उकळले. त्यानुसार आम्ही अभिमन्यूसह त्याचे साथीदार सतीश पांडे, अनम अन्सारी आणि एका अनोळखी २२ वर्षीय तरुणीविरोधातही गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी आणखी २३ लोकांची १७.१० लाखांना फसवणूक केल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई