लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोराेनाचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला, तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने काही निर्बंध लावले आहेत. याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळत असला, तरीही मुंबईतील काही दुकानदार मात्र संध्याकाळी ४ वाजता दुकान बंद करण्यास टाळाटाळ करत आहेत. शहरातील अनेक दुकाने बाहेरून कुलूपबंद दिसत असली तरी पाठीमागील बाजूने मात्र सुरू असतात.
दुकानासमोर एखाद्या व्यक्तीला उभे करून ग्राहक येताच ग्राहकाची मागणी पूर्ण केली जाते. याची पालिका प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढू शकतो. काही किराणा दुकानदारही पाठीमागील दाराने वस्तूंची विक्री करत असल्याचेही दिसून येत आहे.
मुख्य मार्गावरील दुकानांत शुकशुकाट...
मुंबई शहरातील मुख्य बाजारपेठ सीएसटी दादर, मज्जीद परिसरातील मुख्य रस्त्यावरील दुकाने मात्र वेळेत बंद होतात. या मार्गावर पोलिसांची तसेच पालिकेच्या गाड्या फिरत असल्याने या परिसरात सायंकाळी शुकशुकाट दिसून येतो.
अंतर्गत दुकानांवर लक्ष कोणाचे
मुंबईतील सायन, चेंबूर, परळ, दादर या परिसरातील काही दुकाने व हॉटेलही बिनधास्त सुरू असल्याचे दिसते. वारंवार प्रशासनाकडून सहकार्याचे आवाहन करण्यात येऊनही काही व्यापारी, दुकानदार याला प्रतिसाद देत नसल्याचे समोर येत आहे.
फेरीवाल्यांची गर्दी वाढली
सीएसएमटी स्थानक परिसरात एकीकडे मुख्य रस्त्यावर दुकाने आणि हॉटेल ४ वाजता बंद करण्यात येत आहेत तर दुसरीकडे फेरीवाल्यांची गर्दी आहे. लहान मुलांची खेळणी, कपडे, मोबाईल कव्हर, आदी वस्तू फेरीवाले फुटपाथवर घेऊन बसत असल्यामुळे मोठी गर्दी होत आहे. या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे पण पालिकेची गाडी गेली की फेरीवाले पुन्हा हजर होत आहेत.
किराणा हवा की जेवण?
मुंबईतील व्यापारी संघटनांनी संध्याकाळी ४ वाजल्यानंतर दुकाने बंद करावी, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. मात्र, काही दुकानदार लपूनछपून आपली दुकाने सुरू ठेवतात. ग्राहकांसाठी दुकानाचे शटर बाहेरून बंद असतानाही सेवा पुरवली जात आहे. त्यामुळे आता ग्राहकांना तुम्हाला काय हवे किराणा हवा की जेवण, दोन्ही मिळेल. पाठीमागच्या दाराने या, असे काही ठिकाणी चित्र दिसून येत आहे. याशिवाय कपड्याच्या दुकानातदेखील दुकाने बंद करून आतमध्ये विक्री केली जात आहे. प्रशासनाने यासाठी शोध मोहीम राबविण्याची गरज आहे.
रात्री ९ वाजेपर्यंत हाॅटेलमध्ये ग्राहकांची रेलचेल
हाॅटेलचा व्यवसाय रात्री ७ ते ११ याचवेळेत हाेतो. दिवसा फार कमी ग्राहक हाॅटेलमध्ये जातात. पण कोरोनाच्या अनुषंगाने सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत असलेल्या वेळेत क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना बसवून सेवा देण्याची मुभा हाॅटेल मालकांना देण्यात आली आहे. ४ वाजल्यानंतर केवळ पार्सल सेवा द्यायची आहे. मात्र, शहरातील हाॅटेल रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतात. हाॅटेलमध्येच जेवणाची व्यवस्था केली जाते. पालिकेचे नियम हाॅटेल मालकांकडून पूर्णपणे धाब्यावर बसविले जात आहेत.
दुकानाबाहेर राहताे कामगार
चेंबूर स्थानक परिसरात मुख्य मार्केटमधील एक कापड दुकान अर्धवट शटर ओढलेल्या अवस्थेत दिसून आले. बाहेर असलेल्या कामगाराला दुकान सुरू आहे काय? आपल्याला कपडे घ्यायचे आहेत असे विचारले असता, कामगाराने दुकान सुरू असल्याचे सांगितले. शटर उघडून दुकानात प्रवेश केला असता, काही ग्राहक दुकानामध्ये कपडे खरेदी करत असल्याचे दिसून आले.