Join us

सयाजी महाराजांचे कार्य महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचू शकले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:06 AM

मुंबई : सयाजी महाराजांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा, उद्योग, साहित्य, कला, धर्म, अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत केलेले काम त्या काळातील ...

मुंबई : सयाजी महाराजांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा, उद्योग, साहित्य, कला, धर्म, अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत केलेले काम त्या काळातील ५६५ भारतीय संस्थानिकांच्या तुलनेत केवळ अद्वितीय असेच होते. पण हे त्यांचे कार्य गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचू शकले नाही, अशी खंत शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समितीचे प्रमुख आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबा भांड यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या जुलै अंकाचे प्रकाशन करताना व्यक्त केली.

शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समिती, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्था हे कार्य संशोधन ग्रंथ, पुस्तके, ई-बुक यांच्या साहाय्याने पोहोचवत असल्याचे सांगून बाबा भांड म्हणाले, आर्थिक नुकसानीत असलेल्या राज्याचा कारभार हाती घेताच आर्थिक काटकसरीचे उपाय योजताना सयाजीराव महाराजांच्या लक्षात आले. राज्यासाठी होणाऱ्या खर्चातील बराचसा भाग जवळजवळ १० टक्के हिस्सा हा राजघराण्याच्या पूजाविधी, कर्मकांडे, दानदक्षिणा, विविध अंधश्रद्धांच्या नावाखाली अनाठायी खर्च होत आहे. मग याला कायद्याने पायबंद कसा घालता येईल यासाठी त्यांनी समिती नेमून अभ्यास चालू केला. हा त्यांचा प्रयत्न म्हणजे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्वप्नांच्या पूर्तीसाठीची पायाभरणी होती.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनकार्याचे अभ्यासक प्रा. दिनेश पाटील म्हणाले, मध्ययुगीन सरंजामदारी पार्श्वभूमीवर सयाजीराव महाराजांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत जे काम उभे केले त्या कामाचे अधिष्ठान ज्ञान आणि विवेक हे होते. महात्मा फुले यांच्या बहुजनासाठी मोफत शिक्षण, स्त्री शिक्षण या संकल्पनांची पूर्तता करण्याचे काम महाराजांनी आपल्या संस्थानात आरंभले होते. सयाजीराव शाहू महाराजांचे फ्रेंड, फिलोसॉफर आणि गाइड होते.

दरम्यान, या कार्यक्रमाचा प्रारंभ त्रिशला शहा आणि आशा धनाले यांच्या चळवळीतील प्रेरणादायी गाण्याने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले. प्रास्ताविक राजीव देशपांडे यांनी केले तर नरेंद्र लांजेवार यांनी आभार मानले.