भूल देण्याच्या यंत्र खरेदीत घोटाळा
By Admin | Published: August 6, 2015 01:38 AM2015-08-06T01:38:18+5:302015-08-06T01:38:18+5:30
महापालिका रुग्णालयात बसविण्यात आलेल्या भूल देण्याच्या यंत्र खरेदीदरम्यान ३ कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. महत्त्वाचे म्हणजे
मुंबई : महापालिका रुग्णालयात बसविण्यात आलेल्या भूल देण्याच्या यंत्र खरेदीदरम्यान ३ कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या कंपनीला भूल देण्याच्या यंत्र खरेदीचे कंत्राट देण्यात आले होते, त्या कंपनीनेच महापालिकेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. खरेदी करण्यात आलेली ‘चायनीज’ भूल यंत्रे रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेदरम्यान काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी हा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. महापालिका रुग्णालयांमध्ये बसविण्यात आलेल्या ‘इन्टिग्रेटेड अनेस्थेस्थिया’ मशिन (भूल देण्याचे यंत्र) खरेदीच्या घोटाळ्यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. महापालिका रुग्णालयांमध्ये ही यंत्रे बसविण्यासाठी प्रशासनाने ‘युनिव्हर्सल आॅर्गॅनिक्स’ कंत्राटदाराला तब्बल ६ कोटी ४२ लाख ६० हजार रुपयांचे कंत्राट दिले. कंपनीशी झालेल्या करारानुसार ५१ यंत्रे खरेदी करणे अपेक्षित होते. त्यानुसार ५१ पैकी केवळ २० यंत्रे लंडन येथून खरेदी करण्यात आली. आणि उर्वरित खरेदी करण्यात आलेली यंत्रे ही ‘चायनीज’ असल्याचा आरोप छेडा यांनी केला. पालिकेने यापूर्वीच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले आहे. तरीही या कंपनीला भूल देण्याच्या खरेदी यंत्राचे कंत्राट देऊन पालिकेने अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणल्याची टीका त्यांनी केली. शिवाय याप्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एसीबी चौकशीची मागणी छेडा यांनी केली आहे. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी या प्रकरणावर कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.