Join us

इंग्लंडच्या विद्यापीठात प्रवेशाचे आमिष दाखवून गंडा; विक्रोळी पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 10:45 AM

याप्रकरणी आशुतोष पगारे, विकास यादव आणि रवी रंजन यांच्या विरुद्ध विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

मुंबई : इंग्लंडमधील किंग्स्टन विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली विक्रोळीतील एका महिलेकडून नऊ लाख दहा हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आशुतोष पगारे, विकास यादव आणि रवी रंजन यांच्या विरुद्ध विक्रोळीपोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये राहणाऱ्या ४७ वर्षीय गृहिणीच्या तक्रारीनुसार, तिच्या मुलाने १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०२२ मध्ये त्याला बॅचलर इन फायनान्समध्ये शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमधील किंग्स्टन विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे मुलाच्या मित्राकडून महिलेची पगारे याच्याशी ओळख झाली. पगारे याने ओळखीने कमी पैशांमध्ये ॲडमिशन करून देण्याचे आमिष दाखविले. मुलाच्या शिक्षणासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये महिला  पगारे याला भेटली. त्यावेळी त्याने दिल्लीतील ओळखीच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत इंग्लंडमधील किंग्स्टन विद्यापीठात मुलाला प्रवेश मिळवून देणार असल्याचे सांगून १३ लाखांच्या वार्षिक फीपैकी नऊ लाख १० हजार रुपये भरण्यास सांगितले. उर्वरित फी स्वयंसेवी संस्था भरेल, असे महिलेला सांगितले. 

१) मुलाच्या भवितव्यासाठी कुटुंबीयांनी विश्वास ठेवून पैसे भरले. महिलेच्या मुलाने किंग्स्टन विद्यापीठात फोन केला असता ॲडमिशन फी भरली नसल्याचे समजले, तसेच विद्यापीठ प्रशासनाने मुलाला मेल पाठवला. त्यात क्रेडिट कार्डद्वारे भरलेली फी त्या व्यक्तीने परत घेतल्याचे त्यात नमूद होते. फी परत भरा नाही तर ॲडमिशन रद्द होईल, असे समजताच महिलेला व मुलाला धक्का बसला. 

२) महिलेने पगारेकडे पैसे परत मागितले असता ॲडमिशनसाठी विकास यादव आणि रवी रंजन यांना पैसे दिल्याचे त्याने सांगितले. त्यांच्याकडून पैसे घेऊन परत देतो, असे पगारे याने सांगितले. 

३) रवी रंजन याने एक लाख ३० हजार रुपये, आशुतोष पगारे याने ६० हजार रुपये आणि अभिमन्यू सुरेंद्र याने दोन लाख रुपये परत केले. विकास यादव याने पैसे परत करण्याचे फक्त आश्वासन दिले. उरलेली रक्कम परत न मिळाल्याने अखेर तक्रारदार यांनी विक्रोळी पोलिस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसविक्रोळीधोकेबाजी