घोटाळेबहाद्दर राऊत मनोरुग्ण! श्रीकांत शिंदे यांचा पलटवार; ते पत्र लिहितात हीच विसंगती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 05:17 AM2024-04-16T05:17:53+5:302024-04-16T05:18:08+5:30
खा. शिंदे म्हणाले की, राऊत यांनी काय पत्र पाठवले ते मी वाचले नाही, मात्र आमच्या फाउंडेशनची इत्यंभूत माहिती त्यांनी ठेवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर केलेल्या आरोपांवर हसावे की रडावे, हेच समजत नाही. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहायला लागले आहेत, असा टोला शिंदेसेनेचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला.
श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ५०० कोटींचा गैरव्यवहार झाला असून, चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे केली. त्याचा खा. शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला.
त्यांना शिव्याशापाशिवाय सुचत नाही
- खा. शिंदे म्हणाले की, राऊत यांनी काय पत्र पाठवले ते मी वाचले नाही, मात्र आमच्या फाउंडेशनची इत्यंभूत माहिती त्यांनी ठेवली आहे. राऊत यांना शिव्याशाप देण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही.
- खा. शिंदे म्हणाले की, राऊत तुम्ही आजपर्यंत कोणाला मदत केली का? काचेच्या घरात राहणारे दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकत नाहीत. आज कोणतीच गोष्ट माहितीच्या अधिकारामध्ये लपत नाही.
- काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले असून, त्यांच्यासाठी चांगला डॉक्टर बघा, त्यांची मदत करायला फाउंडेशनचा वैद्यकीय कक्ष तयार आहे. त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च वैद्यकीय कक्ष करेल, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.