मुंबई : मुंबई महापालिकेच्या ४०० किमी रत्यांच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप माजी मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केला. ४८ टक्के वाढ देऊन कंत्राटदारांना फायदा करून देण्यात आला आहे. या टेंडरला स्थगिती देण्याची मागणीही त्यांनी केली.
मुंबईतील ४०० किमीचे रस्ते काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ६,०८० कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याचे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, याचे पहिल्यांदा टेंडर काढण्यात आले होते. मात्र, त्याबाबत कोणी स्वारस्य न दाखविल्याने ते पुन्हा काढण्यात आले. त्यानंतर ‘शेड्युल ऑफ रेट’मध्येही बदल करण्यात आला. यामुळे कंत्राटदारांना थोडा थोडका नव्हे तर ४८ टक्क्यांचा अतिरिक्त फायदा पोहोचणार आहे. मुंबई महापालिकेत सध्या महापौर किंवा लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत. मग प्रशासकांना ६ हजार कोटींच्या टेंडरबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत का, असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
कंत्राटे मिळविताना संगनमत
कंत्राटे मिळविताना कंपन्यांनी संगनमतही केले आहे. पाच वेगवेगळया कंपन्यांना बरोबर पाच कंत्राटे मिळाली आहेत. एक कंपनी एका कंत्राटात कमी बोली लावून ते कंत्राट पदरात पाडून घेते. मात्र, तीच कंपनी तशाच कामासाठी दुसऱ्या कंत्राटात मात्र जास्तीची बोली लावते, हे कसे असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. सर्वसामान्य मुंबईकरांच्या पैशांची ही लूट असल्याचेही ते म्हणाले.
आ. सदा सरवणकरांकडून गोळीबार करण्यात आला. तसा बॅलेस्टिक अहवाल येऊनही अद्यापही त्यांच्याविरोधात ‘आर्म्स ॲक्ट’अंतर्गत गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही, असा सवालही आदित्य यांनी केला.