कोविड केंद्रात घोटाळा? मुंबई-ठाण्यात छापेमारी, ईडीची १० ते १५ ठिकाणी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 05:46 AM2023-06-22T05:46:22+5:302023-06-22T05:46:44+5:30
याप्रकरणाशी संबंधितांच्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील १० ते १५ ठिकाणांवर छापे टाकले.
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटचे व्यावसायिक मित्र सुजीत पाटकर यांच्या कोविड केंद्राच्या कंत्राटातील कथित घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी छापेमारी केली.
याप्रकरणाशी संबंधितांच्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील १० ते १५ ठिकाणांवर छापे टाकले. त्यात मुंबई महापालिकेतील तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय व शिवसेना सचिव सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांच्या घर आणि कार्यालयांचा समावेश आहे. यामध्ये काही पालिका अधिकारी ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूरज चव्हाण यांच्या चेंबूरमधील के. के. ग्रँड या इमारतीत अकराव्या मजल्यावरील घरावर छापेमारीची माहिती मिळताच शिवसैनिकांनी त्यांच्या इमारतीजवळ गर्दी केली. घोषणाबाजी सुरू झाल्याने येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यापाठोपाठ सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घराचीही ईडीने झाडाझडती घेतली. जयस्वाल हे यापूर्वी कोविडकाळात मुंबई महापालिकेत अतिरिक्त
आयुक्त होते.
प्रकरण काय?
कोरोनाकाळात लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून कोविड सेंटर उभारणी आणि वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
याप्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म, भागीदार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू नंदकुमार साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
कागदपत्रे घेतली ताब्यात
याआधी पाटकरांच्या घरात ईडीला एक कागद सापडला. त्यात कंत्राटानंतर वर्षाने कंपनीच्या खात्यात ३२ कोटी जमा झाले व नंतर रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी पालिकेसोबत करार झाल्याचे समोर आले. आता पुन्हा ईडीने पाटकर यांचे घर, कार्यालये येथून कागदपत्रे उपकरणे ताब्यात घेतली.
कनेक्शन असतील त्यांची चौकशी
घोटाळा बाहेर आला त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली. कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार झाल्या होत्या. लोकांच्या जिवाशी अक्षरश: खेळण्यात आले. पुण्यात तर एका पत्रकाराचाच मृत्यू झाला. या संदर्भातील कनेक्शन असतील त्यांची चौकशी चालली आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री