- मनीषा म्हात्रेमुंबई : गेल्या १० वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गोरेगाव सिद्धार्थनगरच्या पत्राचाळ पुनर्विकासाच्या नावाखाली, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने १ हजार ३४ कोटींचा घोटाळा केल्याचे म्हाडाच्या चौकशीत उघड झाले. त्यानुसार, म्हाडाचे कार्यकारी अभियंता नितीन गडकरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी खेरवाडी पोलिसांनी गुरू आशिषविरुद्ध फसवणूक , गैरव्यवहार, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गोरेगाव पत्राचाळीत २००८ मध्ये गुरू आशिष बिल्डरने पुनर्विकासाचा घाट घातला. म्हाडाच्या मालकीच्या ४७ एकर जागेवरील बैठ्या पत्राचाळीत ६७२ भाडेकरूंचा पुनर्विकास करून, त्यांना ७६७ चौरस फूट घर बांधून देण्याचे आमिष दाखविले, तसेच म्हाडाला २२८९६१.१३ चौरस बांधकाम करून, उर्वरीत जागेतील बांधकाम क्षेत्र स्वत: फ्री करण्याचा करार केला होता. या संदर्भातील पत्रव्यवहार म्हाडाच्या मुख्य कार्यालयातून करण्यात आला.कार्यालयातून ग्रीन सिग्नल मिळताच, विकासकाने येथील भूखंडावर काम सुरू केले. रहिवाशांचे दुसरीकडे स्थलांतर केले. बरीच वर्षे उलटूनही पुनर्विकासाबरोबरच घरभाडेही थकल्याने नागरिक रस्त्यावर उतरले. राजकीय नेत्यांनी विधान परिषदेतत पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी लक्षवेधी मांडली होती. रहिवाशांच्या पुनर्विकासाबरोबर थकीत भाड्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मुंबई मंडळाने बिल्डरला नोटीस बजावली. मुंबई मंडळाने पत्राचाळ प्रकल्प रद्द करत, तो ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात केली आहे.या प्रकरणाची म्हाडाकडून अंतर्गत चौकशी सुरू झाली. यामध्ये करारानुसार, विकासकाने भाडेकरूंना घर बांधून न देता, त्या जागेवरून विस्थापित केले, तसेच म्हाडालादेखील नमूद क्षेत्रफळाची माहिती दिली नाही. तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचे क्षेत्रफळ परस्पर लाटून, त्याची विक्री करीत म्हाडाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार, म्हाडाचे कार्यकारी अभियंता नितीन जगन्नाथ गडकरी यांच्या तक्रारीवरून खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने कागदपत्रांचा व्यवहार म्हाडाच्या मुख्य कार्यालयातून केल्याने हा गुन्हा येथे दाखल करण्यात आला असून, तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती, खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली.>बडे मासे अडकण्याची शक्यताभादंविच्या ४२०, १२०, ४०९ कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात फसवणुकीबरोबरच गैरव्यवहार आणि गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, या कलमांचाही समावेश करण्यात आला आहे. यात बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गुरू आशिष प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मनेरे यांनी दिली. तसेच अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्राचाळ पुनर्विकासात १ हजार ३४ कोटींचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 5:45 AM