कृत्रिम पावसाच्या प्रयोगात घोटाळा
By admin | Published: June 13, 2015 04:15 AM2015-06-13T04:15:31+5:302015-06-13T04:15:31+5:30
पाण्याचे टेन्शन मिटवण्यासाठी यावर्षी पुन्हा कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर केला जात आहे़ मात्र यापूर्वी २००९ मध्ये फेल गेलेल्या या
मुंबई : पाण्याचे टेन्शन मिटवण्यासाठी यावर्षी पुन्हा कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर केला जात आहे़ मात्र यापूर्वी २००९ मध्ये फेल गेलेल्या या प्रयोगातून पालिकेला आर्थिक चुना लावण्यात आला असल्याचा ठपका मुख्य लेखापरीक्षकांनी ठेवला आहे़ त्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाबाबत साशंकता व्यक्त होत आहे़
२००९ मध्ये मुंबईवर ओढावलेल्या पाणी संकटाचा सामना करण्यासाठी पालिकेने कृत्रिम पाऊस पाडण्याचा पर्याय निवडला होता़ त्यानुसार पालिकेने मॅकोनी एन्टरप्रायझेस या कंपनीला जमिनीवरून ढगांचे बीजीकरण करण्यास व अग्नी एव्हिएशनला आकाशातून विमानद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी नियुक्त करण्यात आले़ या प्रयोगासाठी पालिकेने १९ कोटी रुपये खर्च केले़ त्यानुसार मोडक सागर तलाव परिसरात २० आॅगस्ट, ७ सप्टेंबर आणि ६ आॅक्टोबर रोजी हा प्रयोग करण्यात आला़
मात्र ५ आॅक्टोबर रोजी हा तलाव भरून वाहू लागला असताना या प्रयोगाची गरज नव्हती़ प्रयोग करण्यापूर्वी तलाव परिसरात वाऱ्याची गती व दिशादर्शक यंत्र आवश्यक असताना कृत्रिम पाऊस पाडल्यानंतर १९ आॅक्टोबर रोजी ४९ लाख रुपयांना हे यंत्र खरेदी करण्यात आले़ प्रत्यक्षात त्यापूर्वीच या कंत्राटाची मुदत संपली होती, असे लेखापरीक्षका अहवालातून उजेडात आले आहे़
हा घोटाळा सन २०१०-२०११ च्या मुख्य लेखापरीक्षण अहवालातून स्थायी समितीपुढे आज मांडण्यात आला़ (प्रतिनिधी)