मुंबई : महापालिकेच्या बालवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मंजूर केलेले अनुदान संस्थाचालक लाटत असल्याचा आरोप भाजप नगरसेविका सुरेखा पाटील यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत केला. १३१ बालवाड्यांतील शिक्षिकांना आणि त्यांच्या मदतनीस जून, २०१९ पासून पगारापासून वंचित असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. याचे तीव्र पडसाद शिक्षण समितीच्या बैठकीत उमटले.महापालिकेमार्फत १,३३४ बालवाड्या चालविण्यात येत आहेत. या बालवाड्यांसाठी महापालिका पैसे देत असताना, १३१ बालवाड्यांतील शिक्षिकांना आणि त्यांच्या मदतनिसांना पगार मिळालेला नाही. बालवाडीच्या इतर खर्चासाठी असलेले दोनशे रुपयेदेखील संस्था चालकांकडून खर्च केले जात नाहीत. इतर खर्चासाठी सुमारे २४ लाख रुपये महापालिकेकडून संबंधित संस्थांना दिले जाते. संस्थाचालक ती रक्कम आपल्या खिशात घालत असल्याचा आरोप पाटील यांनी शिक्षण समितीमध्ये केला.बालवाडीच्या शिक्षिकेला पाच हजार रुपये, तर मदतनिसाला तीन हजार रुपये वेतन पालिका संस्थेकडे देत असते. शिक्षिका आणि मदतनिसांच्या वेतनाचा पैसा संस्था चालक स्वत: वापरतात. काही वेळा बालवाडीसाठी असलेला खर्च शिक्षिका आणि मदतनीस स्वत:च्या पैशांनी करतात. तरीही बालवाडीत एक विद्यार्थी कमी झाल्यास त्या शिक्षिकेला पगार दिला जात नाही. विद्यार्थी वाढले, तरी त्यांच्या पगारात वाढ होत नाही, असे पाटील यांनी निदर्शनास आणले.संस्था कशाला? : शिक्षिका आणि मदतनिसाचे वेतन आणि इतर खर्चासाठीही महापालिका रक्कम देते, वर्गाचे भाडे महापालिकेकडून घेतले जाते, मग बालवाडी चालविण्यासाठी संस्था हवीच कशाला? असा प्रश्न सुरेखा पाटील यांनी केला.हिशोब द्या... : बालवाडीच्या इतर खर्चासाठी महापालिका दोनशे रुपये देत असते. त्यानुसार, बालवाड्यांनी किती रक्कम देण्यात आली आणि त्यातील किती रक्कम खर्च झाली, याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी शिक्षण समिती सदस्या डॉ.सईदा खान यांनी केली.
पालिकेच्या बालवाड्यांमध्ये घोटाळा? नगरसेविकेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 3:04 AM