Join us

विकासकाच्या फायद्यासाठी घोटाळा , पोलिसांमार्फत चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 2:06 AM

मोक्याच्या ठिकाणी असलेली कोट्यवधी किमतीची जागा विकासकाच्या घशात घालण्यासाठी पालिका आयुक्तांनी हा भूखंड ताब्यात घेण्याकरिता दिलेल्या शेऱ्यातच छेडछाड करण्यात

मुंबई : मोक्याच्या ठिकाणी असलेली कोट्यवधी किमतीची जागा विकासकाच्या घशात घालण्यासाठी पालिका आयुक्तांनी हा भूखंड ताब्यात घेण्याकरिता दिलेल्या शेऱ्यातच छेडछाड करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी आयुक्तांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पालिका मुख्यालयातील फाइल्समध्ये दिवसाढवळ््या अशी फेरफार होत असल्याची गंभीर दखल घेत, सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी आता जोर धरीत आहे.जोगेश्वरी येथील मजास वाडीमधील १३ हजार ६७४ चौ. फुटांचा भूखंड मनोरंजन मैदान व रुग्णालयासाठी आरक्षित आहे. या भूखंडाची किंमत सुमारे पाचशे कोटी रुपये आहे. नियमानुसार हा भूखंड महापालिकेच्या ताब्यात देण्यासाठी जमीन मालकाने खरेदी नोटीस बजावली होती. त्याप्रमाणे, एक वर्षाच्या कालावधीत ही जागा पालिकेने ताब्यात घेणे अपेक्षित होते. मात्र, ही नोटीस महापालिकाऐवजी आयुक्तांच्या नावाने काढल्यामुळे अवैध ठरली. परिणामी, हा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली.याचा फायदा उठवत संबंधित जमीन मालकाने उच्च न्यायालयात धाव घेऊन या भूखंडाचे आरक्षण रद्द करण्याची विनंती केली. ही याचिका न्यायालयानेही ग्राह्य मानली. या निर्णयाविरोधात सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्याचा शेरा आयुक्त अजय मेहता यांनी या प्रकरणाच्या फाइलवर लिहिला होता. मात्र, यात फेरफार होऊन न्यायालयात जाऊ नये, असे करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस तक्रार करण्यात आली आहे.