जकात दस्तावेजांचे स्कॅनिंग महागडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2015 01:11 AM2015-07-12T01:11:12+5:302015-07-12T01:11:12+5:30
जकात कर पुढच्या वर्षीपासून रद्द होण्याच्या मार्गावर असताना नाक्यांवरील दस्तावेज डिजिटाईज करण्यासाठी पालिका करोडो रुपये उडवत आहे़ हे काम गेले
मुंबई: जकात कर पुढच्या वर्षीपासून रद्द होण्याच्या मार्गावर असताना नाक्यांवरील दस्तावेज डिजिटाईज करण्यासाठी पालिका करोडो रुपये उडवत आहे़ हे काम गेले अनेक वर्षे संथगतीने सुरु असल्याने या कामाच्या खर्चात तरतुदीपेक्षा शंभर टक्के वाढ झाली आहे़ विशेष म्हणजे आयुक्त अजोय मेहता यांनी अशा वाढीव खर्चांवर निर्बंध आणण्याचे आदेश काढल्यानंतरही असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़
पालिकेचे अनेक प्रकल्प दिलेल्या मुदत पूर्ण होत नाहीत़ त्यामुळे काही वर्षांनी या प्रकल्पाचा खर्च वाढतो़ वाढत गेलेला हा खर्च अनेकवेळा कोटी रुपयांचा आकडा पार करतो़ त्यामुळे आयुक्तांनी काही दिवसांपूर्वीच असे वाढीव खर्चाचे प्रस्ताव उदा़ रस्त्यांची दुरस्तीचा प्रस्ताव फेटाळला होता़ तरीही जकात नाक्यांवरील दस्तावेज डिजिटाईज करण्याचा खर्च ३९ कोटी रुपयांवरून ७५ कोटींपर्यंत पोहोचला आहे़ हा प्रकल्प सप्टेंबर २०१५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे़
पालिकेने २०११ मध्ये जकात कागदपत्रांचे स्कॅनिंग सुरु केले़ त्यावेळी त्याचा खर्च ३९़ १७ कोटी अपेक्षित होता़ ३़५ कोटी दस्तावेजांच्या स्कॅनिंगसाठी पाच वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता़ यामध्ये १़०२ कोटी सिल्व्हर कार्ड, ५० लाख दस्तावेज, १़९३ कोटी डाटा एॅण्ट्रीचे स्कॅनिंग होणार होते़ मात्र या कामाचे स्वरुप वाढल्यामुळे आधी हा खर्च ४३़११ कोटी आणि आता ७५़०३ कोटींवर पोहोचला आहे़ (प्रतिनिधी)