‘फॅक्टर ८’ इंजेक्शनचा तुटवडा

By admin | Published: February 11, 2016 03:39 AM2016-02-11T03:39:14+5:302016-02-11T03:39:14+5:30

हिमोफिलियाग्रस्तांचा रक्तस्राव थांबण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘फॅक्टर ८’ इंजेक्शनचा गेल्या १५ दिवसांपासून मुंबईसह ठाण्यात तुटवडा आहे. केईएम रुग्णालयात आणि

Scarcity of 'factor 8' injection | ‘फॅक्टर ८’ इंजेक्शनचा तुटवडा

‘फॅक्टर ८’ इंजेक्शनचा तुटवडा

Next

- पूजा दामले,  मुंबई
हिमोफिलियाग्रस्तांचा रक्तस्राव थांबण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘फॅक्टर ८’ इंजेक्शनचा गेल्या १५ दिवसांपासून मुंबईसह ठाण्यात तुटवडा आहे. केईएम रुग्णालयात आणि ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध असणाऱ्या या इंजेक्शनसाठी आता रुग्णांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत, तर काहींना हे इंजेक्शन परवडत नसल्याने उपचाराशिवायच घरी जावे लागत आहे.
सांध्यांत अंतर्गत रक्तस्राव झाल्यास अथवा जखम झाल्यावर रक्तस्राव होऊ लागल्यास हिमोफिलियाग्रस्त रुग्णांचा रक्तस्राव थांबणे अशक्य बनते. रक्तस्राव थांबवण्यासाठी त्यांना ‘फॅक्टर ८’ हे इंजेक्शन घेण्याशिवाय पर्याय नसतो. अतिरक्तस्रावामुळे यांना अपंगत्व येऊ शकते अथवा त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या रुग्णांसाठी इंजेक्शन अत्यंत महत्त्वाची ठरतात. डिसेंबर २०१५ मध्ये फॅक्टर ८ इंजेक्शन्स पाठवण्यात आले होते. पण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात फॅक्टर ८चा साठा संपला आहे. त्यामुळे सध्या अनेक रुग्णांचे हाल होत असल्याचे हिमोफिलिया सोसायटीच्या मुंबई चॅप्टरचे सुनील जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
रक्तस्राव सुरू असलेल्या हिमोफिलियाग्रस्तांना रक्ताच्या फॅक्टरची ही इंजेक्शन्स द्यावी लागतात. परेलच्या केईएम रुग्णालयात आणि ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात हिमोफिलियाग्रस्तांसाठी ‘डे केअर’ केंद्र चालवण्यात येते. मुंबई आणि ठाण्यात मिळून २ हजार हिमोफिलियाग्रस्तांची नोंद आहे, तर केईएममध्ये सुमारे ५०० हिमोफिलियाग्रस्त राज्यातून उपचार घेण्यासाठी येतात. केईएम रुग्णालयात दरमहा अडीच लाख युनिट आणि ठाण्यात दीड लाख युनिट फॅक्टर ८ची आवश्यकता असते. पण सध्या दोन्ही ठिकाणी फॅक्टर ८चे इंजेक्शन उपलब्ध नाही. फॅक्टर ८च्या १ हजार युनिटसाठी १५ हजार रुपये मोजावे लागतात. सरासरी पाहता रुग्णाला आठवड्यातून किमान एकदा दोन हजार युनिट लागतात. हा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो, असेही जाधव यांनी सांगितले.

‘मुंबई आणि ठाण्यात फॅक्टर ८ च्या इंजेक्शनचा तुटवडा आहे, हा विषय माझ्यापर्यंत अजूनही आलेला नाही. नक्की काय झाले आहे, याची मी चौकशी करते. राज्यातील अन्य ठिकाणी ही इंजेक्शन्स जेथे उपलब्ध असतील तेथून मागवता येतील, असे सार्वजनिक आरोग्य खात्याच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

हिमोफिलिया म्हणजे काय?
हिमोफिलिया हा अनुवंशिक आजार आहे. या व्यक्तींमध्ये रक्तातील १३ घटकांपैकी एक घटक कमी असतो किंवा अनुपस्थित असतो. त्यामुळे अशा व्यक्तींना सांध्यांमध्ये अंतर्गत रक्तस्राव होतो. या रुग्णांना एखादी जखम झाल्यास रक्तस्राव सुरू झाल्यावर तो थांबणे अशक्य होते. हा आजार पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण तुलनेने कमी आहे. पण महिला या आजाराच्या वाहक नसतात.

या फॅक्टरची गरज
हिमोफिलियाग्रस्तांना फॅक्टर ८, फॅक्टर ९, थिबा आणि नोव्हा ७ या रक्ताच्या फॅक्टरची प्रामुख्याने आवश्यकता असते. यामधील थिबा आणि नोव्हा ७ या फॅक्टरची आवश्यकता कमी प्रमाणात असते. रक्तात अ‍ॅण्टिबायोटिक्स तयार झाल्याने ते औषधांना दाद देत नसल्याने थिबाचे इंजेक्शन हिमोफिलियाग्रस्तांना द्यावे लागते.

फॅक्टर ८ ची आवश्यकता अधिक
हिमोफिलियाग्रस्तांना फॅक्टर ८ आणि ९ ची आवश्यकता सर्वाधिक असते. सरासरी १०० हिमोफिलियाग्रस्त असतील तर ७० जणांना ‘फॅक्टर ८’ची गरज असते. तर ३० जणांना फॅक्टर ९ ची गरज असते, असे हिमोफिलिया सोसायटी मुंबई चॅप्टरकडून सांगण्यात आले.

याआधीही झाला
होता तुटवडा
एप्रिल २०१५ मध्येही ‘फॅक्टर ८’चा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता. त्या वेळी अनेक रुग्णांना उपचाराशिवाय घरी पाठवावे लागले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून थोडी मदत झाली. पण ‘फॅक्टर ८’ इंजेक्शन्स डिसेंबरमध्ये आले. आता २६ जानेवारीपासून हे सर्व फॅक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून पुन्हा ‘फॅक्टर ८’चा मोठा तुटवडा आहे. फॅक्टर ९ इंजेक्शन्सदेखील कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.

Web Title: Scarcity of 'factor 8' injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.