मुंबईत बाजारसमिती बंदच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:07 PM2018-11-27T12:07:54+5:302018-11-27T12:09:27+5:30
भाजीपाला : सोमवारी तर वर्षभरातील सर्वात कमी आवकची नोंद झाली असून फक्त ८२९ टन भाजीपाला व फक्त ४ लाख जुडी पालेभाज्या विक्रीसाठी आल्या होत्या.
शासनाच्या विरोधात २७ नोव्हेंबरला मुंबई बाजारसमिती बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांनी सोमवारपासूनच कृषी माल कमी मागविण्यास सुरवात केली आहे. शनिवारी मार्केटमध्ये २१५३ टन भाजीपाला व ७ लाख २८ हजार जुडी पालेभाज्यांची आवक झाली होती. परंतु सोमवारी तर वर्षभरातील सर्वात कमी आवकची नोंद झाली असून फक्त ८२९ टन भाजीपाला व फक्त ४ लाख जुडी पालेभाज्या विक्रीसाठी आल्या होत्या.
बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भाजीपाल्याची तीव्र टंचाई होणार असून ग्राहकांना जादा दराने भाजीपाला विकत घ्यावा लागणार आहे. भाजी मार्केटमधील आवक घटली असली तरी कांदा- बटाट्याची आवक मात्र प्रचंढ वाढली आहे. सोमवारी तब्बल २४६४ टन कांदा बाजारात विक्रीसाठी आला होता. यामुळे कांदा ६ ते १९ रूपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर, बटाटाही ७ ते १८ रूपये किलो दराने विक्री होत आहे.