लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून वेगवेगळ्या प्रकारे इशारे दिले जातात. शनिवारी ट्विटरवर ‘अटक झाल्यानंतरचे ‘दृश्य’ फार सुखद नसेल!’ या भाषेत नियम न पाळणाऱ्याची कानउघडणी करण्यात आली.
रस्ते सुरक्षा दरम्यान चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे जेणेकरून त्यांच्यासह अन्य कोणाच्याही जीवाला धोका पाेहोचू नये यासाठी पोलिसांकडून अथक परिश्रम घेतले जात आहेत. त्यामुळे दारूच्या नशेत गाडी चालवताना चालकांना डोळ्यासमोर सगळे अस्पष्ट दिसेल, मात्र जेव्हा शुद्ध येईल तेव्हा जे काही दिसेल ते सुखद नसेल. म्हणजेच नशेत गाडी चालवल्यास कायद्याचा बडगा त्यांच्यावर उगारला जाईलच. मात्र, आपल्या चुकीची शिक्षा एखाद्या निष्पाप व्यक्तीला मिळेल, त्याच्या मृत्यूला आपण कारणीभूत असू किंवा यात आपल्या जीवाचे काही बरेवाईट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘दृश्य सुखद नसेल’ असा उल्लेख पोलिसांकडून करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.