निसर्गरम्य आरे कॉलनीचा ‘कचरा’
By admin | Published: April 12, 2015 12:14 AM2015-04-12T00:14:12+5:302015-04-12T00:14:12+5:30
मुंबईचे फुप्फुस अशी ओळख असलेल्या आरे कॉलनीतील गर्द हिरवळीवर नव्या विकास आराखड्यातून कचरा वर्गीकरण केंद्र सुचविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शेफाली परब-पंडित ल्ल मुंबई
मुंबईचे फुप्फुस अशी ओळख असलेल्या आरे कॉलनीतील गर्द हिरवळीवर नव्या विकास आराखड्यातून कचरा वर्गीकरण केंद्र सुचविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आधीच विकासकामांना आरे कॉलनी खुली करण्यावरून पर्यावरणप्रेमींच्या संतापात भर पडण्याची शक्यता आहे.
सुमारे ३ हजार एकरवर वसलेली आरे कॉलनी हा मुंबईतील सर्वांत मोठा हरित पट्टा आहे. या हरित पट्ट्यावर चित्रनगरी, छोटा काश्मीर, दुग्धव्यवसाय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रस्तावित प्राणिसंग्रहालय आहे. मात्र मेट्रो कारशेड, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता अशा अनेक विकास प्रकल्पांमुळे या हरित पट्ट्याला धोका निर्माण झाला आहे़ त्यातच आता विकास आराखड्यातील शिफारशींमुळे आतापर्यंत ‘ना विकास क्षेत्र’ असलेल्या आरे कॉलनीचे द्वार विकासासाठी खुले होणार आहे़ २०१४-२०३४ या विकास आराखड्याच्या प्रारूपातील या तरतुदींचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे़
दरम्यान, या शिफारशींवर ठाम राहत आरेचा विकास न झाल्यास येथे दुसरी धारावी वसेल, असे वादग्रस्त विधान महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केले होते. मात्र हा हरित पट्टा विकासासाठी खुला करण्याबरोबरच आणखी अनेक घोळ आराखड्यात घालण्यात आले असल्याचे आता उजेडात येऊ लागले आहे़ घनकचरा वर्गीकरण केंद्र हे त्यातले एक उदाहरण आहे, असा आरोप वॉच डॉग फाउंडेशनचे गॉडफे्र पेमेन्टा करतात. (प्रतिनिधी)
आरे कॉलनीमधून गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता जाणार आहे़ या प्रकल्पामुळे पश्चिम व पूर्व उपनगर जोडले जाऊन मुंबईकरांचा प्रवास जलद व सुकर होणार आहे़ मात्र या प्रकल्पात काही वृक्षांची कत्तल होण्याचा धोका व्यक्त होत होता़ यावर उन्नत मार्गाचा पर्याय निवडण्यात आला़ तसेच वृक्षांच्या पुनर्रोपणाचीही हमी पालिकेने दिली़
मुंबई मेट्रो प्रकल्प ३च्या कारशेडसाठी आरे कॉलनीची जागा देण्यात येणार होती़ यामुळे सुमारे २ हजार वृक्षांना धक्का बसणार होता़ याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्याने अखेर या कारशेड बांधणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली़
पुढील २० वर्षांमध्ये शहराच्या विकासाचे नियोजन करताना आरे कॉलनी विकासासाठी खुली करण्यात आली़ मात्र यामुळे बिल्डरांचा फायदा होणार, अतिक्रमण वाढणार, हा विकास नव्हे विनाश आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत़ यात कचरा वर्गीकरण केंद्राने भर घातली आहे़
आरे कॉलनीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्यात येणार आहे़ मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक येत असतात़ मुंबईकरांसाठी हे मोठे विरंगुळा केंद्र असताना तेथे कचरा वर्गीकरण केंद्र स्थापन करण्याचे खूळ का सुचले? कचऱ्याची दुर्गंधी आणि या
प्रकल्पामुळे आरे कॉलनीच धोक्यात येईल़ याबाबत पालिकेकडे हरकती व सूचनांद्वारे विरोध दर्शविला आहे़
अप्रतिम असा हा आरे कॉलनीचा परिसर पर्यटकांचे आकर्षण आहे़ त्यात कचराकुंडी म्हणजे मूर्खपणाचेच ठरेल़ हा विकास आराखडा नव्हे डिझास्टर (आपत्ती) आणि डिस्ट्रेक्शन (विध्वंस) आहे़
- डी़ स्टेलिन, पर्यावरणप्रेमी, वनशक्ती
मागणीनुसारच कचरा केंद्राचे आरक्षण
आरे कॉलनीत अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे़ तसेच आजूबाजूला असलेल्या झोपडपट्टीमुळे येथे कचरा साठलेला असतो़ या भागात कचराकुंड्या कमी पडत असल्याने येथे घाणीचे साम्राज्य असते़ प्लास्टिक, घरगुती आणि बांधकामाचा कचरा येथे टाकण्यात येत असल्याने या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती़ त्याचा विचार करूनच ही शिफारस आराखड्यातून करण्यात आली असावी, असे पालिकेतील एका अधिकाऱ्याने निदर्शनास आणले़