Join us

एससीईआरटीचे ऑनलाइन प्रश्नसंच विद्यार्थ्यांच्या मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावी-बारावीची परीक्षा अवघ्या महिन्यांवर आलेली आहे. या परीक्षेला बसणाऱ्या ३० लाख विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावी-बारावीची परीक्षा अवघ्या महिन्यांवर आलेली आहे. या परीक्षेला बसणाऱ्या ३० लाख विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) त्यांच्या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रश्‍नसंच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे प्रश्नसंच विद्यार्थ्यांना सराव व्हावा म्हणून देण्यात आले आहेत, असे एससीईआरटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात कोरोना वाढत असल्याने दहावी-बारावी वगळता सर्वच शाळा ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. यंदा दहावीसाठी १६ लाख तर बारावीसाठी १४ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर बंद असलेल्या शाळा आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्यांमुळे ऑनलाइन शिक्षणातील अडथळ्यामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभ्यास होऊ शकलेला नाही. त्यामुळे परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव करता यावा, यासाठी हे प्रश्‍नसंच तयार केले जात आहेत.

--

या विषयांचे प्रश्नसंच तयार

सध्या दहावीच्या गणित भाग १, इतिहास आणि राज्यशास्त्र, भूगोल यातील विषयाचे प्रश्नसंच अपलोड करण्यात आले आहेत. तर बारावी बोर्ड परीक्षेचे वाणिज्य शाखेचे गणित, इतिहास, इंग्रजी, विज्ञान शाखेच्या गणित, रसायनशास्त्र जीवशास्त्र, इंग्रजी आणि कला शाखेचे इंग्रजी, इतिहास भूगोल,गणित विषयाचे प्रश्नसंच अपलोड करण्यात आले आहेत. इतर विषयांचे प्रश्नसंच लवकरच विद्यार्थ्यांसाठी अपलोड केले जाणार असल्याची माहिती उपसंचालक विकास गरड यांनी दिली.

----

प्रत्येक विषयांच्या घटकांवर किमान १५ ते २० प्रश्‍न, असा प्रत्येक विषयांचा प्रश्‍नसंच असणार आहे. गणित, विज्ञान, भाषा या विषयावर प्रश्नसंचाचा विशेष भर असेल. तसेच विद्यार्थ्यांना यु ट्युब आणि सह्याद्री वाहिनीवर देखील याबाबत बोर्ड परीक्षेच्या शेवटच्या दिवसांपर्यत मार्गदर्शन केले जाणार आहे.

- दिनकर टेमकर, संचालक एससीईआरटी