अरुण टिकेकर अभ्यासकेंद्राच्या वतीने शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 03:37 AM2018-08-26T03:37:45+5:302018-08-26T03:38:04+5:30
अर्ज सादर करण्याचे आवाहन : २५ आॅक्टोबरपर्यंत मुदत
मुंबई : नामवंत संशोधक, ज्येष्ठ संपादक दुर्मिळ ग्रंथांचे संग्राहक आणि विचारवंत डॉ. अरुण टिकेकर यांचे १९ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले. डॉ. टिकेकरांनी २००७ ते २०१३ अशी सहा वर्षे एशियाटिक सोसायटीचे अध्यक्षपद सांभाळले. डॉ. टिकेकरांच्या कार्याचे स्वरूप म्हणून एशियाटिक सोसायटीने डॉ. अरुण टिकेकर प्रगत अभ्यासकेंद्राची स्थापना केली आहे. याच अंतर्गत डॉ. टिकेकर अभ्यासवृत्ती सुरू केली असून, विविध वयोगटीतल व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या केंद्रातर्फे तिसरी डॉ. टिकेकर शिष्यवृत्ती त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत १ फेब्रुवारी २०१९ रोजी दिली जाईल. यावर्षी महाराष्ट्र किंवा पूर्वीच मुंबई प्रांत यातील ऐतिहासिक आणि किंवा समकालीन संस्कृती या संशोधनक्षेत्रातील विविध विषयांवर ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. त्यात लोकसाहित्य व मौखिक पंरपरा, सण व उत्सव (नवीन प्रवाह), वास्तुरूप वारसा व वर्तमानातील वारसा, बदलत्या सामाजिक प्रथा व चालीरीती, पाककला परंपरा व खाद्यसंस्कृती या विषयांचा समावेश आहे. ही शिष्यवृत्ती रुपये सव्वा लाख रुपयांची असून, एका वर्षांसाठी आहे. आपला संशोधकीय प्रबंध मराठी, इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत सादर करता येणार आहे. ३० ते ६५ या वयोगटातील इच्छुकांना यासाठी अर्ज करता येईल. डॉ. टिकेकर शिष्यवृत्तीच्या इतर सर्व अटी व सूचना एशियाटिक सोसायटीच्या कार्यालयात अथवा संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच, अर्जही दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत.
संशोधन प्रस्ताव व पूर्ण भरलेले अर्ज सोसायटीच्या कार्यालयात २५ आॅक्टोबर २०१८ पर्यंत स्वीकारले जातील. इमेलद्वारे पाठविलेले अर्ज प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत.