लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा एक महिना लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही परीक्षा २५ एप्रिल रोजी होणार होती. मात्र आता ती २३ मे २०२१ रोजी होईल.
या आधी ही परीक्षा २१ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र एमपीएससीची राज्य सेवा पूर्वपरीक्षा अचानक त्याच दिवशी आयोजित करण्यात आल्याने परिषदेला ही परीक्षा पुढे ढकलून २५ एप्रिल रोजी ठेवावी लागली होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही परीक्षा पुन्हा ढकलण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन नियाेजनानुसार आता २३ मे राेजी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होईल. यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात परीक्षा लांबणीवर टाकण्यामागील कारणांचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
यंदा या परीक्षेसाठी राज्यातून ८ हजार ६१२ शाळांमधील ९७ हजार ५२६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र ही परिषदेच्या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या लॉगीनवर उपलब्ध झाली आहेत.
* अर्जांना मुदतवाढ
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी शाळांना १० एप्रिल २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत ३० मार्च २०२१ रोजी संपणार होती. ही अर्जप्रक्रिया यंदा ऑनलाइन आहे. अर्ज करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
......................