लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इयत्ता पाचवी आणि आठवीची ८ ऑगस्ट रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा ९ ऑगस्टला होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे. आतापर्यंत या परीक्षेच्या तारखा तीन वेळा बदलण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारमार्फत घेण्यात येणारी सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ८ ऑगस्ट रोजी आहे. त्यामुळे आता ८ ऑगस्टऐवजी ९ ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी जाहीर केले आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र शाळांच्या लॉगिनमध्ये मंगळवारपासून उपलब्ध करून दिल्याचेही परिषदेने स्पष्ट केले आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ४७ हजार ६१६ शाळांमधील तब्बल सहा लाख ३२ हजार ६६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील पाच हजार ६८७ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा २०२१
- पाचवीचे विद्यार्थी : ३,८८,४०५
- आठवीचे विद्यार्थी : २,४४,२६२
- एकूण विद्यार्थी : ६,३२, ६६७
- शाळांची संख्या : ४७,६१६
- परीक्षा केंद्रांची संख्या : ५,६८७