शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी
By admin | Published: August 4, 2015 01:26 AM2015-08-04T01:26:27+5:302015-08-04T01:26:27+5:30
राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्तीतील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी तसेच भविष्यात
मुंबई : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्तीतील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी तसेच भविष्यात असे प्रकार रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमण्याचे आदेश सोमवारी दिले.
मुख्यमंत्र्यांनी ‘की रिझल्ट एरिया’च्या (केआरए) माध्यमातून प्रत्येक विभागासाठी योजनांचे लक्ष्य ठरवून दिले आहे. त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजनासाठी त्यांच्या खात्यात रोख रक्कम जमा करण्याबाबत प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प शहरी भागातील एका वसतिगृहात राबवावा आणि तो यशस्वी झाल्यानंतर अन्यत्र राबवावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती देय नाही, त्यांनाही ती दिली जात आहे. त्यामुळे अशा संस्थांचे गेल्या काही वर्षांत पेव फुटले असून, बोगस विद्यार्थ्यांच्या नावे या संस्था कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती लाटतात, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. याच पार्श्वभूमी मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले.