Join us

शिष्यवृत्ती योजना, राज्य सेवा परीक्षा एकाच दिवशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:09 AM

विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ...

विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) आयोजित करण्यात येते. सध्या रद्द करण्यात आलेली एमपीएससीची राज्य सेवा परीक्षा यापूर्वी १४ मार्च रोजी घेण्यात येणार असल्याने ही परीक्षा २१ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. आता एमपीएससीची रद्द झालेली परीक्षा २१ मार्च रोजी आयोजित करण्यात आल्याने दाेन्ही परीक्षा एकाच दिवशी हाेतील. त्यामुळे एनएमएमएसची परीक्षा कशी आणि कधी होणार, ती पुढे ढकलणार का, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांकडून उपस्थित होत आहे.

शिष्यवृत्ती योजना परीक्षेसाठी यंदा राज्यातून ८ हजार ६१२ शाळांमधील ९७ हजार ५२६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. राज्यातील ३७ जिल्ह्यांतील ७६१ परीक्षा केंद्रावरही आठवीसाठी ही परीक्षा होणार होती. तसेच परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रेही परिषदेच्या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या लॉगीनवर उपलब्ध झाली आहेत. मात्र आता या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने शिष्यवृत्ती योजना परीक्षा पुन्हा पुढे ढकलली जाणार का असा प्रश्न विद्यार्थी पालकांना पडला आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून अद्याप यावर काेणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

* काय आहे शिष्यवृत्ती योजना ?

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक ही केंद्र शासन पुरस्कृत योजना असून महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळेत इयत्ता आठवीत शिकत असलेले नियमित विद्यार्थी, विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतात. मात्र त्यासाठी कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते बारावीपर्यंत अशी एकूण चार वर्षे दरमहा पाचशे रुपये याप्रमाणे वर्षाला एकूण सहा हजार रुपये शिष्यवृत्ती केंद्र सरकारमार्फत मिळते. ती त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

लवकरच निर्णय घेणार

मागच्या वेळी एमपीएससी परीक्षा १४ मार्चला आयोजित केल्याने शिष्यवृत्ती परीक्षा २१ मार्चला आयोजित केली होती. आता एमपीएससी परीक्षा २१ मार्चला हाेणार असल्याने लवकरच शिष्यवृत्ती योजना परीक्षेच्या तारखेबाबत निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात येईल.

- तुकाराम सुपे,

आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

------------------------------