कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती
By admin | Published: March 15, 2017 02:49 AM2017-03-15T02:49:45+5:302017-03-15T02:49:45+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय कार्यालयाने कामगार कुटुंबीय गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा शुक्रवार, १७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केला आहे
मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय कार्यालयाने कामगार कुटुंबीय गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा शुक्रवार, १७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केला आहे. नायगाव येथील ललित कला भवनमध्ये पार पडणाऱ्या या कार्यक्रमात क्रीडा शिष्यवृत्ती व परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती वितरण सोहळाही पार पडणार आहे.
मुंबई विभागात शालान्त परीक्षेत व उच्च माध्यमिक परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या १५ कामगार कुटुंबीय पाल्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे. तर विदेशात उच्च शिक्षण घेत असलेल्या २३ कामगार कुटुंबीय पाल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण ११ लाख ५० हजार रुपये रकमेची परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळविलेल्या ७, राष्ट्रीय स्तरावरील ३ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ५ कामगार पाल्य खेळाडूंना एकूण १ लाख १७ हजार एवढ्या रकमेची
क्रीडा शिष्यवृत्तीही या वेळी दिली जाईल.
या कार्यक्रमात रायगड जिल्ह्याचे कामगार उप आयुक्त अ.द. काकतकर, माझगाव डॉकचे कामगार कल्याण अधिकारी सतीश आंदेगावकर हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुंबई नागरिक को-आॅप. सोसा. लि.चे सचिव आशिष भालेराव भूषवणार आहेत. कार्यक्रमास कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांची विशेष उपस्थिती असेल. तरी कामगार व कामगार कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई विभागाचे सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी केले आहे. (प्रतिनिधी)