श्वानदंशाच्या रुग्णांमध्ये सहा हजारांनी घट
By Admin | Published: May 11, 2017 02:25 AM2017-05-11T02:25:16+5:302017-05-11T02:25:16+5:30
भटक्या श्वानांपासून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने दोन प्राणीप्रेमी संस्थांशी करार केला आहे. या संस्था दररोज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भटक्या श्वानांपासून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने दोन प्राणीप्रेमी संस्थांशी करार केला आहे. या संस्था दररोज १०४ श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणार आहेत. मात्र, गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या प्रयत्नांच्या यशामुळेच श्वानदंशाच्या संख्येत सहा हजारांनी घट झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
भटक्या श्वानांना मारण्यास बंदी असल्याने त्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना सोडून देण्यात येते. मात्र, ही मोहीम गेल्या काही वर्षांमध्ये थंडावल्याने भटक्या श्वानांची संख्या आणि उपद्रव वाढला असल्याचा आरोप होत आहे.
हा दावा खोडून काढण्यासाठी महापालिकेने नवीन योजना आणली आहे. त्यानुसार युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटी आणि ईगल फाउंडेशन या दोन प्राणीमित्र संस्थांशी करार करून भटक्या श्वानांना आवर घालण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
२०१६मध्ये ११ हजार ९६७ श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या संस्था येत्या काही दिवसांमध्ये दररोज सरासरी १०४ श्वानांना पकडतील. दररोज किमान १४ आणि कमाल २६ श्वानांवर शस्त्रक्रिया करणे त्यांना बंधनकारक आहे.
यासाठी प्रत्येक श्वानामागे या संस्थांना तीनशे रुपये मिळणार आहेत. तसेच श्वानांना पकडण्यासाठी या संस्थांना चार वाहने देण्यात येणार आहेत. त्यामुळे ही मोहीम प्रभावी स्वरूप घेऊन श्वानांच्या निर्बीजीकरणाला वेग येईल, असा पालिकेचा दावा आहे.