एप्रिलमध्ये शाळा, ऑफलाइन परीक्षा नकाे रे बाबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:06 AM2021-04-01T04:06:21+5:302021-04-01T04:06:21+5:30
सर्वेक्षणातील निष्कर्ष; ५८ टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास अनुत्सुक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काेराेना संसर्ग वाढत असल्यामुळे पालक ...
सर्वेक्षणातील निष्कर्ष; ५८ टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास अनुत्सुक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेना संसर्ग वाढत असल्यामुळे पालक धास्तावले आहेत. एप्रिलमध्ये शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करून खबरदारीने शाळा उघडल्याच तरी देशातील केवळ २५ टक्के पालकांनीच आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी दाखवली आहे. याउलट एप्रिलमध्ये शाळा, ऑफलाइन परीक्षा नकाेच, असे मत ५८ टक्के पालकांनी मांडले.
काही मुलांच्या शाळा एप्रिल, मेमध्ये उन्हाळी सुट्ट्यांसाठी बंद असल्याने १० टक्के पालकांनी यावर उत्तर दिले नाही तर, ७ टक्के पालकांनी यासंदर्भात द्विधा मन:स्थिती व्यक्त केली. वाढत्या काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सर्कल या संस्थेने देशातील २७२ जिल्ह्यांतील १८ हजारांहून अधिक पालकांची मते या सर्वेक्षणाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भविष्यात शाळा सुरू करताना स्थानिक प्रशासनाने किंवा सरकारने कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, यासंदर्भातही पालकांची मते जाणून घेण्यात आली. यावर जिल्ह्यात काेराेनाची रुग्णसंख्या १०० च्या आसपास किंवा जास्त असल्यास निश्चितच शाळा सुरू करणे धोक्याची घंटा ठरू शकते, असे मत २९ टक्के पालकांनी व्यक्त केले. रुग्णसंख्या २०० हून अधिक असेल तर शाळा सुरू करू नये, असे १८ टक्के पालक म्हणाले, तर ५०० हून अधिक रुग्ण आढळल्यास शाळा बंद कराव्यात, असे मत ७ टक्के पालकांनी मांडले.
* जूनपासूनच सुरू व्हावे शैक्षणिक वर्ष!
काेराेना संसर्ग वाढत असल्याने परीक्षेसाठी ऑफलाइन व ऑनलाइन अशा संमिश्र पद्धतीचा विचार करण्यास हरकत नसल्याचे पालिकांनी सर्वेक्षणात नमूद केले. जिल्ह्यात काेराेना रुग्ण असताना शैक्षणिक संस्था सुरू करण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगीच देऊ नये, अशी प्रतिक्रिया २१ टक्के पालकांनी नाेंदवली. जवळपास ७३ टक्के पालकांनी आपल्या जिल्हा, परिसरात काेराेना रुग्णसंख्या १०० हून अधिक असल्यास ऑफलाइन किंवा प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास विरोध केला. शैक्षणिक वर्ष जूनपासूनच सुरू करण्याचा विचार करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. सोबतच दहावी, बारावी परीक्षांचा विचार करता केंद्रीय आणि राज्य मंडळांनी देशभरातील एकूण परिस्थितीचा आणि तेथील स्थानिक संसर्गाचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक ठरणार असल्याचे पालकांनी सांगितले.
...........................