आरटीई प्रवेशासाठी शाळांची मनमानी
By admin | Published: April 12, 2015 01:56 AM2015-04-12T01:56:29+5:302015-04-12T01:56:29+5:30
मुंबई महापालिका क्षेत्रातील वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या खासगी शाळांमधील प्रवेशाची सोडत नुकतीच काढण्यात आली.
मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) मुंबई महापालिका क्षेत्रातील वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या खासगी शाळांमधील प्रवेशाची सोडत नुकतीच काढण्यात आली. यामध्ये प्रवेश मिळालेल्या सुमारे १00 विद्यार्थ्यांकडून शाळांनी शुल्क मागितल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप अधांतरीच आहेत. शाळा विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्काची मागणी करीत असताना महापालिकेचा शिक्षण विभाग बघ्याच्या भूमिकेत राहिल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया मुंबई महापालिका शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. सोडत जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश मिळालेल्या शाळेचे नाव एसएमएसमार्फत कळविण्यात येणार होते. मात्र पालकांना एसएमएससाठी चार ते पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागली. एसएमएस मिळाल्यानंतर मुंबईतील धारावी, अंधेरी, घाटकोपर आदी भागातील शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शुल्क मागितल्याचा आरोप अनुदानित शिक्षण बचाव समितीने केला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश हवा असल्यास प्रथम चेकद्वारे प्रवेश शुल्क भरण्याची सक्ती शाळांकडून करण्यात येत आहे.
याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतरही शाळांवर कारवाई होत नसल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे. प्रवेश नाकारणाऱ्या शाळांना महापालिका पत्र पाठवून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची विनंती करीत आहे. मात्र अशा शाळांवर आजवर शिक्षण विभागाने कारवाई न केल्याने शाळा गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असल्याचे समितीचे सुधीर परांजपे यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
अंधेरी, धारावी आणि घाटकोपर या भागांतील सुमारे १00 पालकांनी अनुदानित शिक्षण बचाव समितीकडे तक्रार केली आहे. शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यास शिक्षण विभाग आणि शाळांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात येईल, असेही परांजपे म्हणाले.