लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत असले तरी हा निर्णय नियोजनाअभावी घाईगडबडीत घेतला गेल्याच्या प्रतिक्रिया अभ्यासक, शिक्षकांकडून व्यक्त होत आहेत.
राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले की, शिक्षण विभागाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. शाळा सुरू करताना प्रत्यक्ष कृतीसाठी आरोग्य पथकांची नेमणूक शिक्षण विभागाला करता आली असती, तसेच उपस्थिती आवश्यकतेनुसार हळूहळू वाढविता आली असती. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी लोकल प्रवासाची परवानगी देण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
----------------------------
गेल्या दीड वर्षापासून गरीब-शोषित-वंचित वर्गातील विद्यार्थ्यांचे शिक्षण व्हेंटिलेटरवर आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय अत्यंत योग्य आहे; पण हे करीत असताना सरकारने तातडीने सर्व शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. विद्यालयाच्या सॅनिटेशनची काळजी घ्यावी व टप्प्याटप्प्याने योग्य ती सर्व खबरदारी घेऊन सरसकट सर्व शाळा सुरू कराव्यात.
-रोहित ढाले, राज्य कार्याध्यक्ष, छात्रभारती विद्यार्थी संघटना
----------------------------
शाळा सुरू करण्याच्या सूचना आल्या. मात्र, शाळांना अवघी एका आठवड्यात सुविधांची जुळवाजुळव कशी करावी हा प्रश्न आहे. सगळ्याच शाळांतील अनेक विद्यार्थ्यांचा दुसरा डोस बाकी आहेत, अशात अर्ध्या शाळा सुरू, अर्ध्या नाही यामुळे तफावत निर्माण होऊ शकते. शिवाय दिवाळीच्या तोंडावर शाळा सुरू करण्याचे नियोजन असल्याने पुन्हा १० हून अधिक दिवस शाळा बंद राहणार, त्यापेक्षा हा निर्णय नियोजन करून दिवाळीनंतर घेणे उचित ठरले असते.
पांडुरंग केंगार, सचिव, मुख्याध्यापक संघटना, मुंबई
----
कोणतेही नियोजन आणि तयारीशिवाय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर लादली आहे, तसेच अनेक विद्यार्थी शाळांमध्ये येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करीत असल्याने सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. उच्च शिक्षण संस्था अजूनही बंद आहेत. मग लहान मुलांच्या शाळा सुरू करण्याची घाई का? उद्या लहान मुलांमधूनच सुपर स्प्रेडर निघाले तर याची जबाबदारी शिक्षण विभाग घेणार का?
- अनुभा सहाय, अध्यक्षा, इंडिया वाइड पॅरेंटस् असोसिएशन