नवी मुंबई : पामबीच मार्गावर सीवूड येथे स्कूल बसला अपघाताची घटना सकाळी घडली. भाजी वाहतुकीच्या टेंपोने स्कूल बसला धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात टेंपो क्लिनरसह पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर टेंपो चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
पामबीच मार्गावर अक्षर चौक येथे सकाळी पावणोसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सीवूड येथील पोदार इंटरनॅशनल शाळेची बस (एमएच 43 एच 1638) अक्षर चौकातून पामबीचवर वळण घेत होती. नेरूळ परिसरातील मुलांना घेऊन ही बस शाळेकडे चालली होती. यावेळी वाशीकडून बेलापूरच्या दिशेने जाणा:या पिकअप टेंपोने (एमएच 46 इ 58क्5) बसच्या मागच्या बाजूला धडक दिली.
टेंपो मालक शरद गाडे हे भाजीचा माल घेऊन चालले होते. या दरम्यान टेंपो चालक राजू याच्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडला. टेंपोच्या धडकेने स्कूल बसमध्ये मागील बाजूस बसलेले 5 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर सीबीडीच्या एमजीएम रुग्णालयात उपचार करुन घरी पाठवण्यात आल्याचे एनआरआय पोलिसांनी सांगितले. तर यावेळी टेंपो मालक शरद गाडे हे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नेरूळच्या डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु अपघातानंतर टेंपो चालक राजू याने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. त्याच्यावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सुदैवाने यावेळी तेथून मोठे वाहन जात नव्हते, अन्यथा बसचा गंभीर अपघात घडला असता. (प्रतिनिधी)