लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस बंद आहेत, त्यामुळे स्कूल बस मालकांना अडचणींना सामोरे जावे लागत असून विविध मागण्यांसाठी मंगळवारी स्कूल बसचालकांनी आझाद मैदान येथे आंदोलन केले. स्कूल बसचालकांना एक वर्षासाठी कर्जमाफी देण्यात यावी, अशी बस मालकांनी केली. यावेळी राज्यातील विविध भागांतील स्कूल बस मालक उपस्थित होते.
याबाबत स्कूल बस ओनर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मनयन म्हणाले की, स्कूल बस वर्षभर बंद असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वर्षभर बंद काळातील वाहनांची वयोमर्यादा वाढवून मिळावी, वाहन बंद असल्याने फिटनेस मेंटेनन्स, पियुसी, विमा, कर यांची मुदत एक वर्ष वाढवावी, अशी आमची मागणी आहे.
तसेच फिटनेस मेंटेनन्स, पियुसी, विमा मोठ्या स्कूल बसला दीड लाख, मध्यम बसला एक लाख आणि लहान बस (सात आसनी) पन्नास हजार अनुदान मिळावे. बस बंद असलेल्या काळातील हप्ते आणि त्यावरील व्याज माफ करावे. मॅरेटोरिअम कालावधी जुलै २०२१ पर्यंत वाढवून मिळवा, असेही ते म्हणाले.
तर दीपक नाईक म्हणाले की, स्कूल बस बंद असल्याने बस मालकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे स्थानिक महापालिका क्षेत्रात लोकल वाहतुकीसाठी परवानगी मिळायला हवी. किमान वेतन कायद्याच्या आधारावर महिला मदतनीस, चालक, वाहक यांना प्रति वाहन किमान १०,००० रु. आर्थिक मदत मिळावी. यासोबत स्कूल बसची आयुमर्यादा मुंबईसाठी १५ वर्षे, इतर जिल्ह्यांसाठी २० वर्षे इतकी वाढवावी, असे ते म्हणाले.
===Photopath===
151220\2027-img-20201215-wa0004.jpg
===Caption===
स्कुल बसचालक आंदोलन