Join us  

गेल्या १४ महिन्यांपासून स्कूलबसचे चाक थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:07 AM

काहीजण वडापावच्या गाडीवर करतात कामलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा सर्वाधिक फटका हा स्कूलबस चालक, मालकांना बसला आहे. ...

काहीजण वडापावच्या गाडीवर करतात काम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा सर्वाधिक फटका हा स्कूलबस चालक, मालकांना बसला आहे. गेल्या १४ महिन्यांपासून स्कूलबसची चाके एकाच जागेवर असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही चालकांना वडापावच्या गाडीवर काम करावे लागत आहे, तर काही चालक कोरोना रुग्णवाहिका चालवीत आहेत.

गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. ताे रोखण्यासाठी देशात गेल्यावर्षी २४ मार्चपासून ते जून महिन्यापर्यंत लॉकडाऊन होता. जून महिन्यापासून अनलॉकचे टप्पे सुरू झाले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने बहुतांश उद्योगधंदे सुरू झाले, दुसरीकडे नर्सरी ते आठवीचे वर्ग सुरू झाले नाहीत. त्यामुळे स्कूल बसची चाकेही जागेवरच होती. याचा सर्वाधिक फटका स्कूलबसच्या मालक, चालकांना बसला आहे. ९ ते १२ वीचे वर्ग केवळ एका महिन्यासाठी सुरू राहिले. गत १४ महिन्यांपासून स्कूलबस धावल्या नसल्याने चालक, मालकांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा पेच निर्माण झाला. स्कूल बसमधून खासगी प्रवासी वाहतूकदेखील करता येत नसल्याने स्कूलच्या अनेक चालकांना पर्यायी व्यवसाय शोधावा लागत आहे.

१४ महिन्यांपासून वाहन उभे असतानाही विविध प्रकारचा कर भरण्याची वेळ आली आहे. यामुळे स्कूलबसच्या मालकांसमोरही आर्थिक प्रश्न निर्माण झाला. काहींनी पर्यायी व्यवसाय सुरू केला तर काही जणांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. काही चालकांनी अन्य वाहनावर चालक म्हणून रोजगार शोधला आहे. काही स्कूल व्हॅन, ऑटोवाल्यांनी शहरात खासगी प्रवासी वाहतूक करण्याचा प्रयल केला. मात्र, यामध्ये फारसे यश आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

एकूण स्कूलबस : ८५००

चालकांची संख्या : सुमारे ८५००

किती मुले रोज स्कूलबसने प्रवास करायचे : ६५००००

* मागण्या काय?

१) रिक्षाचालक, बांधकाम कामगारांप्रमाणे स्कूलबस चालकांना सरकारने आर्थिक मदत करावी.

२) बस खरेदीसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ मिळावी.

३) या कर्जाच्या व्याजामध्ये सवलत मिळावी.

४) बसची भरलेली विम्याची रक्कम परत द्यावी अथवा पुढील वर्षासाठी ती वर्ग करावी.

* आर्थिक परिस्थिती बिकट

कोरोना काळात बस चालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. काहीजण भाजीपाला विकत आहे, काहीजण गाड्या धुण्याचे काम करीत आहेत, तर बस सहायक असणाऱ्या महिला सफाई काम, जेवण बनविण्याची कामे करीत आहेत. बस मालकांना गाडीच्या कर्जासाठी त्रास दिला जात आहे.

- अनिल गर्ग, अध्यक्ष , स्कूल बस ओनर्स असोसिएशन

* बँकेचे कर्ज फेडण्याची चिंता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत; पण नियमानुसार इतर ठिकाणी स्कूलबस चालविता येत नाही. १४ महिन्यांपासून गाड्या उभ्या असल्या तरी बँकेचे कर्ज, त्याचे व्याज सुरू आहे, सरकारचा कर सुरू आहे. हे सर्व कसे भरायचे, हा मोठा प्रश्न आहे.

- रमेश मनियन, बस मालक

* सरकारने मदत करावी

स्कूलबस चालवून मिळणाऱ्या पगारातून घर चालत होते. हे काम थांबल्याने आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कोरोना रुग्णवाहिका चालविणे सुरू केले आहे. राज्य सरकारने स्कूलबस चालकांना मदत करणे आवश्यक आहे.

- गणेश शिंदे, स्कूल बसचालक

* घरखर्च चालविणे अवघड

स्कूलबसचे काम थांबल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वडापावच्या गाडीवर काम करीत आहे; पण त्यातून घरखर्च चालत नव्हता. म्हणून पहाटे ५.३० ते ११.३० आणि सायंकाळी ७.३० ते १२ टॅक्सी चालवीत आहे. दुपारी १२ ते ६ वडापावच्या गाडीवर काम करीत आहे.

- मेहबुब शेख, स्कूलबस चालक

...............................................