शाळेची बस दुभाजकावर चढली; विद्यार्थ्यासह क्लीनर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 05:39 AM2019-03-02T05:39:45+5:302019-03-02T05:39:47+5:30
शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला.
मुंबई : कांदिवली परिसरात चिल्ड्रेन्स अकॅडमी शाळेच्या बसचा दुभाजकावर चढून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या बसमध्ये जवळपास ४९ प्राथमिक शाळेचे विद्यार्थी होते. या अपघातात एका विद्यार्थ्यासह क्लिनर किरकोळ जखमी झाला असून, पोलिसांनी रामचंद्र साटम नामक चालकाला अटक केली आहे.
शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. बस शुक्रवारी दुपारी प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना घरातून शाळेकडे घेऊन निघाली होती. मात्र, भरधाव वेगाने बस घेऊन निघालेल्या साटमचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती रस्ता दुभाजकावर जाऊन चढली. कांदिवलीच्या एम.जी.रोड परिसरात हा अपघात घडल्यानंतर याबाबत स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले.
त्यानुसार, कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बस अर्धवट कलंडलेल्या स्थितीत असल्याने ती पलटण्याची भीती होती. त्यामुळे पोलिसांनी काळजीपूर्वकपणे बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यानंतर, बस क्रेनच्या साहाय्याने घटनास्थळाहून बाजूला करण्यात आली.
पालकांना याबाबत समजताच त्यांनी शाळेत धाव घेतली. साटमला पोलिसांनी ताब्यात घेत, त्याच्यावर निष्काळजीपणे गाडी चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. ‘अपघातात क्लीनरसह एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. बसचा चालक हा नशेत नसल्याचे वैद्यकीय चाचणीत उघड झाले असून, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला,’ अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंडकुले यांनी दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.