पोदार इंटरनॅशनलची स्कूल बस ४ तास बेपत्ता, चालकाला रस्ता माहीत नसल्याचे शाळेचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 10:13 AM2022-04-05T10:13:45+5:302022-04-05T10:14:13+5:30

School Bus: शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेची वेळ संपल्यानंतर ४ तास उलटूनही मुले घरी न परतल्याने सांताक्रूझमधील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांचे पालक चिंतातूर झाले. मुलांची कोणतीच माहितीच नसल्याने पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे धाव घेतली.

School bus of Podar International goes missing for 4 hours, school explains that driver doesn't know the route | पोदार इंटरनॅशनलची स्कूल बस ४ तास बेपत्ता, चालकाला रस्ता माहीत नसल्याचे शाळेचे स्पष्टीकरण

पोदार इंटरनॅशनलची स्कूल बस ४ तास बेपत्ता, चालकाला रस्ता माहीत नसल्याचे शाळेचे स्पष्टीकरण

Next

मुंबई : शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेची वेळ संपल्यानंतर ४ तास उलटूनही मुले घरी न परतल्याने सांताक्रूझमधील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांचे पालक चिंतातूर झाले. मुलांची कोणतीच माहितीच नसल्याने पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे धाव घेतली. अखेर पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर विद्यार्थी सुरक्षित घरी पोहचले. स्कूल बसचालक नवीन असल्याने आणि त्याला रस्त्यांची माहिती नसल्याने मुलांना त्यांच्या घरी पोहचविण्यास उशीर झाल्याचे स्पष्टीकरण शाळा व्यवस्थापनाने पोलिसांना दिले.
पोदार इंटरनॅशनलसह अनेक सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या शाळांनी सोमवारपासून आपले नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केले आहे. त्यानुसार या शाळेतील विद्यार्थ्यांनीही सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थिती लावली. शाळेच्या पहिल्या सत्रातील वर्ग साडेबारा वाजता संपते. त्यामुळे अर्ध्या ते एक तासांच्या अंतराने स्कूलबसने घरी पोहचणे अपेक्षित होते. पण चार तास उलटूनही ते पोहचले नसल्याने पालक प्रचंड अस्वस्थ झाले. काहींनी शाळेमध्ये धाव घेऊन शाळा व्यवस्थापनाला ही जाब विचारला. मात्र स्कूल बसचालकाचा फोन बंद असल्याने व्यवस्थापनाकडे ही उत्तर नव्हते. तब्बल चार तासांहून अधिक काळ स्कूल बस बेपत्ता असल्याने धास्तावलेल्या पालकांनी सांताक्रूझ पोलीस स्थानकात तक्रार ही नोंदविली. पण त्यानंतर काही वेळाने विद्यार्थी घरी सुरक्षित पोहचले. 

 शिक्षण उपसंचालकांनी मागितला खुलासा 
 सोमवारी शाळेत आलेले विद्यार्थी वेळेवर घरी पोहचलेले नाहीत आणि विद्यार्थी वेळेवर घरी न पोहचल्यामुळे पालकांना प्रचंड मानसिक त्रास झाला. 
 ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याची दखल घेत मुंबईशिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करीत मंगळवारपर्यंत खुलासा सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

शाळेने केली दिलगिरी व्यक्त 
पोलिसांच्या माहितीनुसार, स्कूलबस चालकाला रस्ता माहीत नसल्याने जवळपास २५ ते ३० मुलांना शाळेतून घरी पोहचण्यास उशीर झाला होता. यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. यापुढे पालक व विद्यार्थ्यांना अशा कोणत्याही प्रकाराला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेण्यात येईल अशी, शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हिना शाह यांनी दिली.  

चालकावरच नाही तर, शाळेवरही कारवाई करा
स्कूलबसमध्ये चालकासोबत एक शिक्षक आणि अटेंडंट आवश्यक असतो. जर चालकाचा संपर्क झाला नाही तर, इतर लोक नव्हते का? नसतील तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठी चूक आहे. शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत एवढी गंभीर नसेल तर, अशा शाळांवर कारवाई व्हायला हवी. - अनुभा सहाय, अध्यक्षा,इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशन

बसचालक, तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ
बसचालकाला रस्ते माहिती नसल्याने गोंधळ झाला. त्यात, तांत्रिक बिघाडामुळे बस पोहचण्यास उशीर झाला. सध्या मुले सुरक्षित असून, त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे.
- विश्वास नांगरे पाटील, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था )

Read in English

Web Title: School bus of Podar International goes missing for 4 hours, school explains that driver doesn't know the route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.