मुंबई : सुरक्षित स्कूल बसमधून मुले प्रवास करतात की नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांचीही आहे. केबिनमध्ये बसलेल्या सरकारी अधिका-यांना स्कूल बस सुरक्षित आहेत की नाही, हे कसे समजणार? त्यामुळे पालकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करणे आवश्यक आहे, असे उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले.केंद्रीय मोटार वाहन कायदा धाब्यावर बसवून राज्यात स्कूल बस चालविण्यात येतात आणि तरीही राज्य सरकार त्यांना परवाना देते. राज्य सरकारला केंद्र सरकारच्या कायद्याचे पालन करून स्कूल बसेस चालविण्याची परवानगी देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका पालक-शिक्षक संघटनेने (पीटीए) उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्या खंडपीठापुढे होती. स्कूल बसेस विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घेतात की नाही, यासाठी जिल्हानिहाय शैक्षणिक समिती, शाळेच्या पातळीवर समिती नेमा, अशी सूचना न्यायालयाने सरकारला केली. तर परिवहन विभागाने आतापर्यंत किती स्कूल बसेसचा अपघात झाला, किती बसेसना आग लागली, याची माहिती द्यावी. जर माहितीच नसेल तर कारवाई कशी करणार, असा सवाल न्यायालयाने परिवहन विभागला केला.पालकांच्या मदतीने एनजीओंनी स्कूल बसेस विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित असतील, याची खात्री करावी. मुंबईत मुले बसमध्ये चढण्यासाठी बसमागे धावतात. त्यांना धावत बस पकडण्याचे प्रशिक्षण मिळते, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली.
‘स्कूल बस; पालकांनीही काळजी घेणे गरजेचे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 6:08 AM