Join us

आता शाळकरी मुलांना 'ज्वारी अन् बाजरीची भाकरी' मिळणार, मध्यान्ह भोजनात बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 11:46 AM

केंद्र आणि राज्य सरकारकडून 1 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते.

मुंबई - शालेय पोषण आहारात तांदुळाची खिचडी कमी करुन विद्यार्थ्यांना ज्वारी आणि बाजरीची भाकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यां गरमा-गरम भाकरीचा आस्वाद घेता येणार आहे. मात्र, या नवीन योजनेमुळे शाळेतील शिक्षक त्रस्त झाले आहेत. कारण, ज्वारीचं पीठ दळून आणायला आपल्याला तर पाठविणार नाहीत ना ? असा प्रश्न शाळेतील शिक्षकांना पडला आहे. 

केंद्र आणि राज्य सरकारकडून 1 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते. त्यामध्ये, विद्यार्थ्यांना तांदळाची खिचडी, मटकी, वटाणा, चना या कडधान्यांचा समावेश होता. मात्र, शासनाने विद्यार्थ्यांना अधिक पौष्टीक अन्न मिळावे, यासाठी या मध्यान्ह भोजनात बदल केला आहे. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यापासून विद्यार्थ्यांन जेवणात ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून सर्वच शाळांना ज्वारी अन् बाजरीचा पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या शालेय पोषण आहारातच अनेक अडचणी येत आहेत. कधी तांदुळाचा पुरवठा नसतो, तर कधी खिचडी बनवणारा स्वयंपाकीच घरी असतो. यासह अनेक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागतो. मात्र, आता तर ज्वारी अन् बाजरीच्या भाकरींची उठाठेव करावी लागणार असल्याने शाळा व्यवस्थापन या निर्णयामुळे नाराज बनले आहे. 

शासनाने विद्यार्थ्यांना भाकरी देण्याचा निर्णय घेतल्याने आता शाळांमध्ये मध्यान्ह भोजन बनविण्यासाठी महिलाचीच भरती करावी लागणार आहे. कारण, सध्या पुरुष स्वयंपाकीही हे भोजन बनवितात. मात्र, भाकरीची अट असल्यास ते स्वयंपाकी तयारी होतील का हाही प्रश्न आहे. तसेच, या स्वयंपाकींना देण्यात येणारे मासिक मानधनही खूप कमी आहे. त्यामुळे मानधन वाढविण्याची मागणीही ते करू शकतील. त्यामुळे शाससाने ही योजना राबवावी, पण यंत्रणाही स्वतंत्र उभारावी असे शाळेतील मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :शाळाविद्यार्थीशिक्षकमुंबईसरकार