Join us

शाळकरी मुलांना इंटरनेटचा लळा; झोपतानाही स्मार्टफोनच हवा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 11:21 AM

स्मार्टफोन वापरणाऱ्या ४२.२ टक्के मुलांची सोशल साईट्सवर अकाउंट्स आहेत. यामध्ये सर्वाधिक ४५.५० टक्के मुलांची इंस्टाग्राम अकाउंट्स आहे

सीमा महांगडे - कोरोनाकाळातील स्मार्टफोन्सच्या वाढलेल्या वापरामुळे शाळकरी मुलांच्या एकाग्रतेवर गंभीर परिणाम होत असल्याचे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या (एनसीपीसीआर) सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशातील तब्बल ३७.१५ टक्के मुलांमध्ये स्मार्टफोन्सच्या अतिवापरामुळे एकाग्रता पातळी कमी झाल्याचे निरीक्षण अहवालातून समोर आले आहे. आयोगामार्फत देशाच्या विविध ६ राज्यांतील ६० शाळांतील ५,८११ शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या सर्वेक्षणातून हा अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये ३ हजार ४९१ विद्यार्थी, दीड हजाराहून अधिक पालक, तर ७५० हून अधिक शिक्षकांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात मुलांचे फेसबुक अकाउंट सर्वाधिक

स्मार्टफोन वापरणाऱ्या ४२.२ टक्के मुलांची सोशल साईट्सवर अकाउंट्स आहेत. यामध्ये सर्वाधिक ४५.५० टक्के मुलांची इंस्टाग्राम अकाउंट्स आहे; तर ३६.८० टक्के मुले फेसबुक वापरतात. स्नॅपचॅट वापरणारी २.२० टक्के मुले असून, ९.१० टक्के मुले व्हाॅटस्ॲप वापरतात; तर महाराष्ट्रात सर्वाधिक मुलांची फेसबुक अकाउंट्स असून त्यांची संख्या ४० टक्क्यांहून अधिक आहे.

यामुळे वाढला वापरमागील २० महिन्यांत शाळा बंद असताना ऑनलाईन शिक्षणामुळे शाळकरी मुलांच्या हाती स्मार्टफोनचा वापर वाढला. ६२.६%विद्यार्थी पालकांचा फोन वापरतात. ३०%  हून अधिक विद्यार्थ्यांकडे स्वतःचा स्मार्टफोन 

असा होतो वापरऑनलाइन अभ्यासासाठी ९४ टक्के मुले फोनचा वापर करीत असली तरी यामध्ये ४० टक्के वापर मेसेजिंगसाठी, २० टक्के वापर गेमिंगसाठी, ३१ टक्के वापर गाणी ऐकण्यासाठी आणि इतर जवळपास ९ टक्के वापर मनोरंजनासाठी करीत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले.

ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढला. यातूनच विचलित अवस्था, अनाकलन, गमावलेला आत्मविश्वास, परीक्षा व काही विषयांची भीती, अपुरी झोप अशा अनेक समस्यांनी विद्यार्थी ग्रासले आहेत. यासाठी शिक्षकांचा जास्त भर अध्यापन, टप्प्याटप्प्याने सराव, मूलभूत संकल्पना समजावून देणे आणि सुहृद संवाद साधणे यांवर असावा. पालकांनी पाल्यांना मनमोकळे बोलण्यास उद्युक्त केले पाहिजे.- जयवंत कुलकर्णी, शिक्षक, समुपदेशक