मुंबई : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांना भेडसावत असलेल्या सरप्लस प्रकरणामुळे नांदेडमधील शिक्षकाने आत्महत्या केल्यावर या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले. यामुळेच संचमान्यता आणि अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नांवर हक्क कृती समितीसह अन्य संघटनांनी शुक्रवारी ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारले होते.
मुंबईसह काही राज्यांतील काही ठिकाणचे अपवाद वगळता आंदोलन झाल्याचे फार दिसून आले नाही. तरीही हा बंद 9क् टक्के यशस्वी झाल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षकांच्या अनेक प्रश्नांची कैफियत सरकार दरबारी मांडूनही पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क समितीने राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले होते. पण या समितीने आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच कायम विनाअनुदानित, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि पालक संघटनांना विचारात घेतले नसल्याने या संघटनांनी शाळा बंदसाठी पाठिंबा दिला नाही. यामुळेच तब्बल 9क् टक्के अनुदानित आणि विनाअनुदानितच्या सर्वच शाळा सुरू राहिल्याचे दिसून आले. मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी शाळांचे वर्ग भरले होते. शिक्षण विभागाकडून कारवाई होईल या भीतीने अनेक शिक्षकांनी ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचे टाळले. या शिक्षकांनी फक्त ‘काम बंद’ आंदोलन करीत या बंदला पाठिंबा दिल्याची माहिती मिळते. (प्रतिनिधी)
16 डिसेंबरला निर्णय
शिक्षक संघटनांनी केलेल्या शाळा बंद आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर शिक्षकांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यावर तावडे यांनी 16 डिसेंबरला निर्णय जाहीर करतो, असे शिक्षकांना सांगितले.