शाळा बंद, मात्र खासगी कोचिंग क्लासेस परवानगी नसताना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:14 AM2021-02-20T04:14:53+5:302021-02-20T04:14:53+5:30

पालकांची घेतली संमती; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काेराेना संसर्गाच्या भीतीने मुंबईतील शाळा सुरू करण्यास ...

School closed, but private coaching classes started without permission | शाळा बंद, मात्र खासगी कोचिंग क्लासेस परवानगी नसताना सुरू

शाळा बंद, मात्र खासगी कोचिंग क्लासेस परवानगी नसताना सुरू

Next

पालकांची घेतली संमती; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काेराेना संसर्गाच्या भीतीने मुंबईतील शाळा सुरू करण्यास पालिकेची अद्याप परवानगी मिळालेली नाही. मात्र, शहरात काही ठिकाणी खासगी कोचिंग क्लासेस परवानगी नसताना सुरू झाल्याचे चित्र आहे. विशेषतः दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांचीच मागणी असल्याने आणि विद्यार्थ्यांना अनेक विषय प्रत्यक्ष समजावून सांगण्यासाठी सुरक्षिततेचे सगळे नियम पळून क्लासेस सुरू केल्याची माहिती काही क्लासचालकांनी दिली. एकीकडे काही क्लास संघटना क्लास सुरू करण्यासाठी शासनाच्या अधिकृत घोषणेची व परवानगीची वाट पाहात आहेत तर दुसरीकडे काही क्लासेस अनधिकृतपणे पुन्हा सुरू झाल्याने समन्वयाचा अभाव असल्याचे पाहायला मिळते.

दहावी-बारावीच्या परीक्षा मार्च, एप्रिलमध्ये घोषित करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा बोर्डाच्या परीक्षांसाठीचा हवा तसा अभ्यास झालेला नाही. राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे मुंबईतही शाळांना अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मुंबईतील पालक, विद्यार्थी चिंतेत आहेत. शाळा बंद आहेत, मात्र सुरक्षिततेचे नियम पाळून क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी, यासाठी महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनने शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन दिले. मात्र, अद्याप त्यावर काहीच निर्णय झाला नसल्याची आणि क्लास सुरू करण्यास परवानगी मिळाली नसल्याची माहिती महाराष्ट्र्र क्लास ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कर्णावत यांनी दिली. अद्याप क्लास ऑफलाईन सुरू न करता ऑनलाईनच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अनेक छोटे, मोठे क्लासेस आहेत, ज्यांना मागील १० ते ११ महिन्यांचे जागांचे भाडे, शिक्षकांच्या शिकविण्याचे पैसे देणे अवघड झाले आहे. त्यातच विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षांची तयारी न झाल्याने पालकांनीही किमान क्लास शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन मिळावे म्हणून विनंत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वतःचे निर्णय घेत अनेक क्लासेसनी प्रत्यक्ष वर्ग सुरू केले आहेत. मात्र, लॉकडाऊनचा निर्णय, शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाचा असल्याने या क्लासेसवर असोसिएशन म्हणून महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन काहीच कारवाई करू शकत नसल्याचे कर्णावत यांनी स्पष्ट केले.

* सरकारने आवश्यक कार्यवाही करावी

लॉकडाऊनच्या सुरुवातीला शैक्षणिक संस्थांसह खासगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याविषयीचा उल्लेख शासनाकडून करण्यात आला, त्यामुळे क्लास बंद ठेवण्यात आले. मात्र, शहरातील लोकल, थिएटर, गार्डनसारख्या इतर सार्वजनिक सुविधा सुरू करताना किंवा शाळांविषयी उहापोह सुरू असताना कोचिंग क्लासेस वगळले जात आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व अनधिकृत पद्धतीने क्लासेस सुरू होऊ नयेत, यासाठी सरकारने ते सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

- सचिन कर्णावत,

अध्यक्ष, महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन

Web Title: School closed, but private coaching classes started without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.