शिक्षणमंत्र्यांची शाळा; महापौरांचे ऐकावे लागत असल्याची कबुली...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 04:56 PM2019-01-01T16:56:27+5:302019-01-01T16:57:37+5:30
विनोद तावडे यांनी विविध विषयांवर 480 शाळांतील विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअल स्टुडिओतून संवाद साधत विद्यार्थ्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन केले.
मुंबई : शालेय शिक्षणमंत्र्यांची नवीन वर्षाची सुरुवात महानगर पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत संवादाने झाली. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे देखिल उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रश्नावर महापौरांकडे जा, त्यांचे मलाही ऐकावे लागते, असे खेळीमेळीत उत्तर देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विनोद तावडे यांनी विविध विषयांवर 480 शाळांतील विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअल स्टुडिओतून संवाद साधत विद्यार्थ्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन केले. कलेत किंवा इतर विषयात रस घेऊन त्याचा अभ्यास केल्यास दहावीला अतिरिक्त गुण मिळणार असल्याने छंद जोपासा असे आवाहन त्यांनी केले.
आपण सोशल मीडियाचे, सायबर गुलाम झालो आहोत. आपल्याला यातून तरुणाईला मुक्त करायचे आहे. मुंबई महानगर पालिकेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडायला हवे. व्हिडिओ गेम छोडो, मैदानसे नाता जोडो, हा नारा द्या. संध्याकाळी 7 ते 9 कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरणार नाही. त्या ऐवजी घरातल्यांशी गप्पा मारा, पुस्तके वाचा, असे आवाहनही तावडे यांनी केले.
प्रश्नोत्तरावेळी एका विद्यार्थ्याने पालक ऐकत नसल्याची तक्रार तावडे यांच्याकडे केली. यावेळी तावडे यांनी हसत पालक ऐकत नाही तर काय करायचे, याचे उत्तर दिले. तुमचे म्हणणे शिक्षकांतर्फे महापौरापर्यंत पोहचवा; त्यांचे सर्वांनाच ऐकावे लागते, मला पण, असे सांगताच विद्यार्थ्यांमध्ये हास्याची लकेर उमटली.
खेळून पोट भरते का? उत्तर हो...
जे विद्यार्थी शालेय जीवनात वेगवेगळ्या स्तरावर भाग घेतील त्यांना 10 गुण जास्त देण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळातील त्यांना नोकरीत 5 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे खेळामुळे पोट भरते का अशा प्रश्नाचे उत्तर हो असे द्या, असे आवाहनही तावडे यांनी केले.