शाळा पडकी अन् छत गळके
By Admin | Published: July 2, 2015 10:44 PM2015-07-02T22:44:18+5:302015-07-02T22:44:18+5:30
वाडा तालुक्यातील गुंज-बुधावली ही आश्रमशाळा ३० वर्षे जुनी असून आजही १९८३ मध्ये तात्पुरत्या बांधलेल्या शेडमध्ये भरते आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये पाऊस तसेच वाऱ्यामुळे
कुडूस : वाडा तालुक्यातील गुंज-बुधावली ही आश्रमशाळा ३० वर्षे जुनी असून आजही १९८३ मध्ये तात्पुरत्या बांधलेल्या शेडमध्ये भरते आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये पाऊस तसेच वाऱ्यामुळे एका वर्गाची भिंत पडून दोन मुले गंभीर तर तीन - चार मुले किरकोळ जखमी झाली होती. वर्ष होऊनही अधिकाऱ्यांना याचे गांभीर्यच नसल्याने येत्या पावसात पुन्हा एखाद्या वर्गाचे शेड पडून मोठी दुर्घटना घडेल, या भीतीने विद्यार्थी जीव मुठीत घेऊनच येथे रात्री झोपतात, तर दिवसा याच तुटक्या शेडखाली धडे गिरवितात. मागचा अनुभव गाठीशी असताना पावसात पर्यायी जागेत शाळेचे विद्यार्थी हलविणे गरजेचे असताना केवळ अधिकाऱ्यांची परवानगी नाही म्हणून धोकादायक इमारतीत शाळा सुरू आहे. या पावसात शाळा सुरक्षित जागेत हलविली नाही तर सर्व मुलांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात भिंत पडल्यानंतर सर्वप्रथम लोकमतमधून छायाचित्रांसह या घटनेचे वृत्त झळकले. त्यानंतर, या विषयाचा वारंवार पाठपुरावा होऊनही अधिकाऱ्यांनी कानांवर हात ठेवले. मार्च २०१५ मध्ये बांधकाम खात्याचे अधिकारी पडझड झालेल्या इमारतीचा अहवाल घेऊन गेले. हा अहवाल अप्पर आयुक्त ठाणे यांच्याकडे दिला आहे, त्याचे पुढे काय झाले, माहीत नाही.
अलीकडेच झालेल्या वादळात शाळेच्या शेडवरील पत्रे फुटले; मात्र १५ दिवस होऊनही त्यांची दुरुस्ती केलेली नाही. छत तर गळके आहेच, पण भिंतींनाही तडे गेले आहेत. मुलांना बसायला बाके नाहीत. ओल्या जमिनीवर बसून विद्यार्थी धडे गिरवितात. सर्वशिक्षा अभियानाकडून आलेली पुस्तके अपूर्ण असून काही मुले फक्त ऐकून शिकतात. प्रकल्प अधिकाऱ्यांकडून आलेल्या १०० पानी वह्या दहावीपर्यंतच्या मुलांना दिलेल्या आहेत. लेखनसाहित्य, पाटी, पेन्सिल व गणवेश अजूनही मिळालेले नाहीत. शाळा आणि वसतिगृह अशी व्यवस्था एकाच खोलीत असल्याने कपडे, पेट्या, बादल्या यामुळे शैक्षणिक वातावरण नसलेल्या शाळेत मुलांची परवड होते. तरीही, शिक्षकांच्या मेहनतीमुळे दहावीचा निकाल १०० टक्के लागतो, असे शिक्षक सुनील मोकाशी यांनी सांगितले. (वार्ताहर)
कुठल्याही वर्गखोलीत शिक्षकांसाठी टेबलखुर्ची नाही. भिंतीला सर्वत्र ओल असल्याने पावसात फळ्यांचा उपयोग करता येत नाही. सर्वच शेड, दरवाजे व खिडक्यांच्या झडपा जोरदार वाऱ्यात टिकत नाहीत. पाण्यासाठी टाकी शोभेपुरती आहे. मुलींसाठी म्हणून दोन-तीन बाथरूम, शौचालये आहेत. मात्र, पाण्याअभावी अनेकदा त्यांचा काहीच उपयोग होत नाही. ही आश्रमशाळा पहिली ते दहावी इयत्तेपर्यंत असून मोठ्या मुलींसाठी पुरेसे संरक्षण नाही.
२४९ मुले, १७१ मुली असे एकूण ४२० विद्यार्थी गळक्या छपरांखाली धडे गिरवितात. शाळेचे मुख्याध्यापक पी.बी. खेडकर हे वास्तव्यास नसल्याने येथील विद्यार्थी असुरक्षित आहेत. केवळ अधीक्षक, वॉचमन, सफाई कामगारांवर त्यांची सुरक्षितता सोपविली आहे. ही खरी जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे.
जोरदार वारा तसेच पावसाच्या माऱ्यात ही शेड टिकणार नाहीत. बांधकाम खात्याचे अधिकारी फक्त पडलेल्या इमारतीची नोंद घेतात. नवीन इमारत बांधायला जागा नाही, असे सांगतात. असलेल्या सर्व इमारती निकामी आहेत. त्या सर्व पाडून जागेचे सपाटीकरण केले तर येथे हवी तेवढी मोठी इमारत होऊ शकते, असे ग्रामस्थ तसेच शिक्षकांचे म्हणणे आहे. तर फक्त एका मुलाच्या नोकरीच्या बदल्यात शाळेलाच लागून असलेली एक एकर जागा फुकट द्यायला एक पालक तयार असताना अधिकाऱ्यांना ते मान्य नसल्याचे समजते.
शाळेची एक इमारत जुलै २०१४ मध्ये पडली. अन्य इमारती धोकादायक असूनही पर्यायी व्यवस्था एक वर्ष झाले तरी केलेली नाही.
एकूण १७१ मुली असताना त्यांच्यासाठी सुरक्षित झोपण्याची जागा नाही. बाथरूम व शौचालये पुरेशी व चांगली नाहीत.
१७१ मुलींची सुरक्षितता कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या हाती सोडून मुख्याध्यापक अन्यत्र वास्तव्य करतात.
बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी शाळा भरविणे व विद्यार्थी वसतिगृहासाठी जागा अयोग्य असल्याचा अहवाल मार्च २०१५ मध्ये देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळा सुरक्षित जागेत हलविण्याबाबत परवानगी दिलेली नाही.
- पी.बी. खेडकर, मुख्याध्यापक
शाळेची परिस्थिती गंभीर आहे. वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. कार्यवाहीबाबत प्रयत्न सुरू आहेत.
- लोमेश सलामे,
प्रकल्प अधिकारी, जव्हार