सकाळी शाळा, दुपारी सर्वेक्षण, शिक्षक मेटाकुटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 09:58 AM2024-01-24T09:58:21+5:302024-01-24T09:59:25+5:30

१५० कुटुंबांचे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना.

School in the morning survey in the afternoon teacher are in trouble in mumbai | सकाळी शाळा, दुपारी सर्वेक्षण, शिक्षक मेटाकुटीला

सकाळी शाळा, दुपारी सर्वेक्षण, शिक्षक मेटाकुटीला

मुंबई : दहावीच्या परीक्षांच्या तोंडावरच मराठा कुटुंबांच्या सर्वेक्षणाचे काम लागल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांतीलशिक्षक मेटाकुटीला आले आहेत. दहावीच्या पूर्वपरीक्षा सुरू असल्याने वर्गावर तर हजेरी लावावीच लागते. त्यामुळे सकाळी शाळेची कामे आटपून दुपारी आणि संध्याकाळी सर्वेक्षणासाठी घरांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही प्रत्येकी सुमारे १५० कुटुंबांचे सर्वेक्षण २३ ते ३१ जानेवारी या काळात पूर्ण करायचे आहे. सर्वेक्षणात कुटुंबाबाबतच्या १५४ प्रश्नांचा समावेश आहे. शिवाय कुटुंबातील प्रत्येक सदस्याची वैयक्तिक माहिती रकान्यांच्या स्वरूपात भरायची आहे. अशी तब्बल ४० पाने प्रश्नावली सर्वेक्षणासाठी देण्यात आली आहेत. सर्व माहिती ॲपवर भरायची आहे. त्यानंतर ज्यांच्याकडून माहिती घेतली, त्यांना दाखवून त्यांच्या संमतीने सबमिट करायची आहे. त्याकरिता २० ते ३० मिनिटे सहज जात आहेत.

बोरीवलीच्या एका शिक्षिकेने दिवसभरात १५ घरांचे सर्वेक्षण केले. दररोज इतक्या कुटुंबांचे सर्वेक्षण केले तरच ३१ जानेवारीपर्यंत त्यांच्याकडील १५० कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण होईल, असे त्यांना वाटते. मात्र, त्यासाठी शाळा बुडवून चालणार नाही. कारण, त्यांच्या शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पूर्वपरीक्षा सुरू आहेत. या शिक्षिका सर्वेक्षणासाठी निघाल्या. त्यामुळे काही दिवस सकाळी सातच्या सुमारास शाळेवर हजेरी लावायची आणि दुपारी सर्वेक्षणासाठी निघायचे, असा शिक्षकांचा दिनक्रम असेल.

दहावीच्या परीक्षा तोंडावर असल्याने सर्वेक्षणासाठी चुकीची वेळ निवडण्यात आली आहे. एप्रिलमध्ये सर्वेक्षण ठेवले असते तर विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नसते आणि आमचीही इतकी दमछाक झाली नसती.- एक शिक्षका, मालाड.

सध्या दहावीच्या पूर्व परीक्षा सुरू आहेत. तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील. अनेक शिक्षकांची इतर काही प्रशिक्षणे सुरू आहेत. त्यांच्याच माथी हे काम का मारले जाते? आमचा सर्वेक्षणाला विरोध नाही. सर्वेक्षणासाठी १०० कुटुंबांकरिता १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. मग हे सर्वेक्षण त्या त्या परिसरातील स्वयंसेवी संस्थांकडून का करून घेतले जात नाही? - शिवनाथ दराडे, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

माहिती देण्यास नागरिकांचा कंटाळा :

प्रश्नावली मोठी असल्याने लोक माहिती देण्यास कंटाळा करीत असल्याचे निरीक्षण एका शिक्षकाने नोंदविले. एका मराठा कुटुंबातील व्यक्तीने  सुरुवातीच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली. पण नंतर ते कंटाळले. पुढची माहिती मी देऊ शकत नाही. दिलेली माहितीही डिलिट करा. मला आरक्षण पण नको, असे सांगत त्यांनी पुढील माहिती देण्यास नकार दिल्याचे त्या शिक्षकाने सांगितले.

Web Title: School in the morning survey in the afternoon teacher are in trouble in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.