दहिसरच्या संस्थेने रंगविली वाड्यातली शाळा 

By मनोहर कुंभेजकर | Published: June 14, 2023 12:07 PM2023-06-14T12:07:54+5:302023-06-14T12:10:22+5:30

शाळा उघडताच प्रसन्न वातावरणाची मिळणार अनुभूती

school in the vada district painted by dahisar organization | दहिसरच्या संस्थेने रंगविली वाड्यातली शाळा 

दहिसरच्या संस्थेने रंगविली वाड्यातली शाळा 

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नव्या वर्षात पहिल्याच दिवशी शाळेत प्रवेश करतांना मुलांचे विविध प्रकारे स्वागत करतांना आपण पाहतोच. हा उत्साही आनंद एक दिवसापुरता न राहता पूर्ण वर्षभर मुलांना मिळावा, या हेतूने दहिसरच्या 'लेट्स इमॅजिन टूगेदर' या संस्थेने वाडा तालुक्यातील मोज येथील जिल्हा परिषद शाळा आतून बाहेरून बदलून टाकली आहे.

शाळेच्या मळकट, एकरंगी भिंती पाहून वर्षभर कंटाळून जाऊ नये, म्हणून चित्रकार प्राची व श्रीबा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्ग, प्रसाधनगृहे तसेच शाळेच्या बाहेरील व आतील सर्व भिंती आधुनिक संकल्पनेनुसार रंगविण्यात आल्या. यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी ३ दिवस कष्ट घेतले. यात विद्यार्थ्यांना भित्ति चित्रणाचा विषय ठरविण्यापासून ते रंग कसे मारावेत इथपर्यंत प्रशिक्षण  देण्यात आले.

पावसाळ्यातला अपुरा सूर्यप्रकाश पाहता छतावर पारदर्शी पत्रे बसविण्यात आले. प्रत्येक वर्गासाठी टेबल फॅन, पुस्तकासाठी रॅक दिले गेले. पूर्ण शाळेत स्वच्छता व आकर्षक मांडणी करण्यात आली. या उपक्रमासाठी लागणारी स्थानिक पातळीवरची जबाबदारी शाळेचे प्रयोगशील शिक्षक किशोर कोठाळे यांनी उचलली. संस्थेचा हा पायलट प्रोजेक्ट असून लोकसहभागातून अधिकाधिक मदत मिळवून वाड्यातील इतर दुर्गम भागातील शाळांना वर्षभरात सुशोभित करण्याचा संकल्प संस्थेचे तरुण सदस्य ओंकार, मानसी व मिहीर यांनी केला आहे.

या परिसरात विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी, पालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वर्षभरात सुसंवादी बैठका घेणार आहोत, असे संस्थाध्यक्षा पूर्णिमा नार्वेकर यांनी सांगितले.

Web Title: school in the vada district painted by dahisar organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.