लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीच्या परीक्षा रद्द करण्यापेक्षा कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन करून परीक्षांचे नियोजन केल्यास त्या शक्य आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱे याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना, परीक्षा कशा घेऊ शकतो यासंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. दहावीच्या परीक्षांचे नियोजन शाळास्तरावर आणि २ सत्रांत केल्यास हे शक्य होऊ शकते, असे नियोजन त्यांनी मांडले आहे.
कुलकर्णी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, शाळांतील चौथी ते दहावीचे वर्ग जरी परीक्षांसाठी उपलब्ध केले तरी, त्या शाळेतील दहावीची एकूण विद्यार्थीसंख्या लक्षात घेऊन त्यांची सकाळ आणि दुपार अशा दोन गटात विभागणी करून परीक्षा घेतल्यास, गर्दी न होता १५ दिवसात परीक्षा पार पाडली जाऊ शकते. तसेच परीक्षा केंद्रांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था, निर्जंतुकीकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास शाळांकडून आवश्यक ती खबरदारी जबाबदारी म्हणून नक्कीच पार पाडली जाईल, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. परीक्षेसाठी खासगी वाहने तसेच आवश्यक अशी विशेष सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाऊ शकते, असे मतही त्यांनी मांडले आहे. राज्य परीक्षा मंडळाला फक्त एकाच दिवसाच्या दोन सत्रांसाठी दोन विविध प्रश्नसंचांचा भार उचलावा लागू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी शाळेमध्ये केवळ परीक्षार्थी, संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांनाच प्रवेश दिला, तर नियोजन व्यवस्थित पार पडू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मूल्यांकन शाळास्तरावर केल्यास प्रश्न सुटेल
यंदाच्या वर्षासाठी शाळेतील उत्तरपत्रिकांचे शाळेतच मूल्यांकन केल्यास मूल्यांकनाचा प्रश्नही सुटू शकेल. जवळच्याच शाळेतील शिक्षकांना यंदा उत्तरपत्रिका तपासणीची जबाबदारी सोपवून संगणकीय व्यवस्थेद्वारे केवळ सगळे गुण शिक्षण मंडळाकडे पोहोचविल्यास शिक्षकांनाही त्रास होणार नाही. अशाप्रकारे मूल्यांकन केल्यास १५ दिवसात निकाल लागेल आणि अकरावी प्रवेशप्रक्रियाही ऑगस्टपासून सुरू करता येईल, असा प्रस्ताव कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्र्यांसमोर मांडला आहे.