संदीप जाधव ल्ल महाडसंस्थेच्या विश्वस्त पदाधिकाऱ्यांमधील मतभेद, ढिसाळ नियोजन, आर्थिक गैरव्यवहार, कर्जाचा वाढता बोजा आदी कारणांमुळे सैनिकी परंपरा लाभलेल्या महाड तालुक्यातील आचळोली येथील रायगड सैनिकी विद्यालय गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्याची नामुष्की संस्थेवर ओढावली आहे. आता मुंबईतील ओशिवरा येथील संस्थेचे विद्यालय देखील पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद होण्याचे संकेत मिळत आहेत. रायगड सैनिकी विद्यालयाची ओशिवरा येथील प्रशस्त इमारत, व्यापारी गाळे तसेच ही मालमत्ता लिव्ह लायसन्स कराराने वापरासाठी देण्याबाबतची जाहिरात संस्थेने बुधवारी मुंबईतील एका दैनिकात प्रसिध्द केल्याने या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. महाडचे वैभव म्हणून ओळख निर्माण झालेली रायगड सैनिकी विद्यालय ही संस्था काही पदाधिकाऱ्यांच्या प्रतापांमुळे आता इतिहासजमा होणार हे स्पष्ट होत असून, संस्थेच्या या वाताहतीमुळे क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांचे स्वप्न भंग झाल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित आणि स्वातंत्र्यसेनानी प्रभाकर कुंटे यांनी कोकणातील सामान्य कुटुंबातील मुलांना सैन्यदलात उच्च पदस्थ अधिकारी होण्याची संधी मिळावी यासाठी १९९० मध्ये महाड शहरानजीक आचळोली येथे रायगड सैनिकी विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयाच्या उभारणीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या जमिनी दान करून विद्यालयाच्या उभारणीत योगदान दिले. प्रवेश मिळवण्यासाठी काही पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी देणगी स्वरूपातही संस्थेला मदत करीत होते. या सैनिकी विद्यालयात मुंबई, पुणे, ठाणे, सुरत आदी शहरातील विद्यार्थ्यांसह स्थानिक विद्यार्थीही मोठ्या संस्थेने प्रवेश घेत असत. या विद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर आपल्या पाल्याचे करिअर उत्तम होणार अशी आशा पालकही बाळगून होते. आचळोली येथील विद्यालयाचा नावलौकिक पाहून मुंबईतही विद्यालय सुरू करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला. विद्यालयाच्या उभारणीसाठी शासनाने मुंबईतील ओशिवरा येथील प्रशस्त भूखंड संस्थेला दिला. आचळोली येथील विद्यालयाच्या उत्पन्नातून तसेच नफ्यातून ओशिवरा येथे संस्थेने आठ मजली अद्ययावत विद्यालय उभे केले. त्यात व्यापारी गाळ्यांचाही समावेश केला. २००५ मध्ये मुंबईतील हे विद्यालय सुरू केल्यानंतर संस्थेने आचळोली येथील विद्यालयाच्या कारभाराकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात आचळोलीतील विद्यालयाच्या कारभारावर विश्वस्तांचे नियंत्रणच राहिले नाही. संस्थेच्या, विद्यालयाच्या प्रत्येक खरेदीत गैरव्यवहार होवू लागले. देणग्या, शैक्षणिक शुल्क यावरही डल्ला मारला जात होता. लेखा विभागातल्या कर्मचाऱ्यांसह संस्थेचे पदाधिकारी देखील या गैरव्यवहारात सहभागी होते. त्यांची चौकशी विश्वस्तमंडळाकडून होत नव्हती. याचाच आर्थिक फटका संस्थेला बसत गेला आणि आचळोली येथील विद्यालयाला उतरती कळा लागली. त्याचा परिणाम विद्यार्थी संख्येवर झाला. सुरुवातीला ९०० विद्यार्थी संख्या असलेल्या या सैनिकी विद्यालयात दोन वर्षांपूर्वी केवळ १०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. बँकेची खाती गोठवली४कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतही संस्थेने सत्तर लाखांचा अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तर या विद्यालयाची सर्वत्र बदनामी झाली. दोन वर्षांपूर्वी कार्याध्यक्ष प्रभाकर कुंटे यांच्या निधनानंतर संस्थेला कोणी वालीच राहिला नाही. पदाधिकारी, विश्वस्तांमधील वाद इतके विकोपाला गेले की, धर्मादाय आयुक्तांनी संस्थेची बँकेची खातीदेखील गोठवली. त्यामुळे संस्थेचे आर्थिक व्यवहारच ठप्प झाले. पदाधिकाऱ्यांचीही पाठ४विद्यालयाला उतरती कळा लागल्यानंतर व संस्था आर्थिक अडचणीत आल्यानंतर संस्थेचा एकही पदाधिकारी तीन वर्षांत विद्यालयात फिरकला देखील नव्हता. आचळोलीतील विद्यालय संस्थेने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या दोन वर्षांत विद्यालयावर अवकळा पसरली आहे. प्रशस्त इमारती, अद्ययावत तरण तलाव, वसतिगृहाच्या प्रशस्त इमारती आदी इमारतींना आता भूतबंगल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.घोड्यांचीही विक्री४आचळोली येथील सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यासाठी सहा घोडे होते. त्यापैकी एक घोडा गतसाली मरण पावला. शिल्लक पाच घोड्यांची विक्री करण्याबाबतची नोटीसही वर्तमानपत्रात संस्थेने प्रसिध्द केली आहे.ओशिवरा येथील विद्यालय देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सैनिकी विद्यालयाचे १९ संस्थापक विश्वस्तांपैकी ९ विश्वस्त मयत झाले असून आम्ही दहा विश्वस्त आज हयात आहोत. २००४ पासून काही जणांनी संस्थेत घुसखोरी करून संस्थेचा कारभार हातात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी संस्थेचे वाटोळे केले आहे. -विनायक राणे, संस्थापक, विश्वस्त.
सैनिकी विद्यालयाला टाळे !
By admin | Published: March 27, 2015 10:48 PM