मुंबई : एका वाक्यातील शब्दाचे स्पेलिंग चुकल्याने १३ वर्षीय विद्यार्थिनीच्या पाठीत शिक्षकाने धपाटा घातला. हा स्पर्श अश्लील असल्याची तक्रार तिच्या पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी सोमवारी याप्रकरणी शिक्षकाला अटक केली आहे. संजय पवार (४७) असे अटक करण्यात आलेल्या या शिक्षकाचे नाव आहे. कांदिवली पश्चिम परिसरात एम.जी. रोड इराणीवाडी परिसरातील शाळेत हा प्रकार घडला. कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी आठवीत शिकते. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पवार या मुलीची वही तपासत होता. स्पेलिंग चुकल्यामुळे त्याने मुलीच्या पाठीत धपाटा घातला. तसेच तिच्या पोटाला चिमटा काढला. हा प्रकार या मुलीला किळसवाणा वाटला. तिने हा प्रकार घरी जाऊन पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी मुख्याध्यापकांची भेट घेऊन लिखित तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला मुख्याध्यापकांनी मुलीच्या पालकांना दिला. त्यानंतर मुलीचे पालक आणि मुख्याध्यापकांनी कांदिवली पोलिसांत धाव घेऊन पवारविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी इतर विद्यार्थिनींचा जबाब नोंदविला आहे. त्यात पवार अनेक मुलींसोबत अशाच प्रकारे वागत असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यानुसार विनयभंग, पॉस्को तसेच संबंधित कलमांनुसार पवारवर गुन्हा दाखल करून सोमवारी त्याला अटक करण्यात आल्याचे कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पवारची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. पोलीस बोलावतील, तेव्हा हजर राहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग
By admin | Published: January 28, 2016 3:04 AM