मुंबई : राज्यातील शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या असल्या तरी त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्ह्याच्या स्थानिक पातळीवर देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पालिका शिक्षण विभागाकडून महापालिका आयुक्तांना सादर केला जाणार आहे, अशी माहिती पालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली. पालिका आयुक्तांच्या निर्णयानंतरच मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचना शाळा व्यवस्थापनांना देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने यासंदर्भातील नियोजन आणि तयारी सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे सुमारे ११ लाख ७२ हजार ४२५ विद्यार्थी तब्बल २० महिन्यांहून अधिक काळानंतर शाळेत पहिले पाऊल ठेवणार आहेत. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या २ हजार ५४१ तर उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या १ हजार ८०२ शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. कोरोना संसर्गासाठी संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा उघडताना घ्यायच्या खबरदारीसाठी पालिका प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून आवश्यक तयारी सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.
महापालिकेच्या आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करतेवेळी विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीपत्रानंतरच शाळेत प्रवेश देण्यात आला होता. तसेच विद्यार्थ्यांना एकाचवेळी एकत्रित न बोलविता समूहाने, दिवसाआड पाचारण करण्यात आले. त्यामुळे, आता पहिली ते सातवीची शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना प्रवेश कसा देणार, याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
इमारतींचे निर्जंतुकीकरणकोरोना नियम पाळूनच शाळा सुरू होणार आहेत. पालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत पहिली ते दहावीपर्यंत १,१५९ शाळा असून, साधारण ५०० इमारती आहेत. त्या इमारतीमध्ये दोन दिवसांतच निर्जंतुकीकरण केले जाणार असल्याची माहिती पालिका शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहे. याशिवाय महापालिकेच्या शिक्षण विभागाने आवश्यक तयारी सुरू करण्यात आली असून, त्यात विद्यार्थ्यांना मास्क, हात धुण्यासाठी साबण, प्रवेशद्वारावर तापमान तपासणी आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.