Join us

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना हवे १८,००० रुपये मानधन; आयटकची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 5:06 AM

कर्मचाऱ्यांना चपराशी कम कुक या पदावर नियुक्त करून १८,००० रुपये मानधन द्यावे, अशी मागणी आयटक संघटनेने केली आहे.

मुंबई : शालेय पोषण आहार कर्मचारी १५ ते १८ वर्षांपासून काम करत आहेत. दिवसभर काम करून त्यांना केवळ १,००० रुपये मानधन मिळते. या मानधनात त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करणे शक्य नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चपराशी कम कुक या पदावर नियुक्त करून १८,००० रुपये मानधन द्यावे, अशी मागणी आयटक संघटनेने केली आहे.संघटनेचे राज्य अध्यक्ष श्याम काळे यांनी सांगितले की, शालेय पोषण आहार योजनेतील कर्मचारी शाळा उघडणे, शाळेची देखभाल करणे, स्वच्छता करणे, जेवणानंतर विद्यार्थ्यांचे ताट धुण्यापासून ते अनेक वेळा शौचालय साफ करावे लागते, परंतु त्यांना १,००० रुपये मानधन मिळते. नुकतेच राज्य सरकारने स्वयंपाकी महिलांच्या मानधनात ५०० रुपयांची वाढ करून बोळवण केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना मानधन व इंधन बिलही मिळालेले नाही. त्यामुळे इतरांसाठी पोषण आहार तयार करणाºयांवर मात्र उपासमारीची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले.या कर्मचाºयांना सामाजिक सुरक्षा लागू करावी, महिन्याच्या ५ तारखेपूर्वी बँक खात्यात मानधन जमा करावे, कर्मचाºयांना अकारण निलंबित करणाºया शाळा व्यवस्थापन समितीवर कारवाई करण्यात यावी, त्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याची व्यवस्था करावी, गॅस सिलिंडर आणि धान्याचा पुरवठा करावा आदी मागण्या काळे यांनी केल्या आहेत.