शाळा ऑनलाइन तरीही शुल्क मात्र पूर्ण ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:06 AM2021-06-20T04:06:11+5:302021-06-20T04:06:11+5:30
मुंबई - नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये विदर्भातील काही शाळा वगळता राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा या ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. ...
मुंबई - नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये विदर्भातील काही शाळा वगळता राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा या ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. एकीकडे शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण जरी सुरू झाले असले तरी दुसरीकडे पालकांची डोकेदुखीही वाढली आहे. पालकांकडून शुल्कासाठी जास्त तगादा लावला जात आहे. विद्यार्थ्यांकडून वापरात नसणाऱ्या सोईसुविधा, उपक्रमांचेही शुल्क शाळा वसूल करत आहेत आणि तसे न केल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून दूर ठेवत असल्याचे प्रकार वाढत असल्याने पालक चिंतेत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शाळा तूर्तास बंद ठेवून ऑनलाइन पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला; मात्र त्यासोबतच शुल्कासंबंधित शाळांना कोणत्याच सूचना नसल्याने नवीन शैक्षणिक वर्षात आधीचे शुल्क पूर्ण करण्याचा तगादा पालकांकडे शाळांकडून होत आहे. मागील वर्षीचे शुल्क पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यांचे मागील वर्षीचे निकाल अडविले जात आहेत. असे प्रकार समोर येत आहेत. एकीकडे शाळा शुल्कासाठी तगादा लावत असताना दुसरीकडे शाळा बंद असल्याने शाळेतील विविध विषयांच्या प्रयोगशाळा, संगणकाचे प्रशिक्षण, विविध उपक्रम, शाळेचे मैदान, ग्रंथालय अशा वैविध्यपूर्ण शिक्षणांपासून विद्यार्थी वर्ग सध्या वंचित आहे. जर विद्यार्थी या सुविधांचा, साहित्याचा वापरच करत नाहीत तर शाळा दरवर्षीप्रमाणे पूर्ण शुल्क का आकारत आहे, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.
शिक्षण विभागाच्या निर्देशांना केराची टोपली
शिक्षण हक्क कायद्यानुसार पालकांनी शुल्कवाढीचा विरोध केला किंवा शुल्क भरले नाही, तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण शाळांना थांबवता येत नाही, असे शिक्षण विभागाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. नुकतेच केवळ शुल्काअभावी कोणत्याही विद्यार्थ्याला ऑनलाइन वर्ग किंवा शिक्षणापासून दूर ठेवता येणार नाही. दरम्यान, असा प्रकार लक्षात येताच सदर शैक्षणिक संस्थेविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तरीही शाळांचा पालकांकडे शुल्क वसुलीसाठी तगादा सुरूच आहे.
ऑनलाइनमुळे असा वाचतो शाळांचा खर्च
ऑनलाइन शिक्षण सुरू असल्यामुळे शाळांचा वीज बिल, पाणी बिल, सफाई खर्च, सुरक्षेचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे. याबरोबरच अनेक खासगी शाळा वाहतूक, प्रात्यक्षिक शुल्क, लायब्ररी शुल्क याचा खर्चही विद्यार्थ्यांकडून वसूल करत आहेत.
काय आहेत पालकांचे आक्षेप
प्रत्यक्षात शाळा सुरू असताना ६ तासांच्या शाळेत विद्यार्थ्यांना सर्व सुविधा, साहित्याचा खर्च पकडून पूर्ण शुल्क आम्ही भरत होतो; मात्र आता शाळा ऑनलाइन असताना, या सर्व सुविधा वापरात नसतानाही आमच्याकडून पूर्ण शुल्क वसूल करणे चुकीचे आहे. शाळांनी शुल्क कपात करून पालकांना दिलासा द्यायला हवा.
- मंजिरी देवळणकर, पालक.
शैक्षणिक शुल्कासाठी मुलाचा प्रवेश थांबवला तरी पालक शाळेची तक्रार करू शकत नाहीत, कारण विद्यार्थ्यांचे भवितव्य ‘त्या’ शाळेच्या हातात असते. त्यामुळे शिक्षण विभागाने तक्रारीची वाट न पाहता, चौकशी करणे आवश्यक आहे. यावर एखादा निर्णय घेऊन शाळांकडून त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे.
- रमेश पाचंगे, पालक.
कोरोना काळात पगार कपात झाल्याने अनेक पालकांनी शाळांचे पूर्ण शुल्क भरले नाही. शाळांना ज्याप्रमाणे आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे, तसाच तो पालकांनाही करावा लागत आहे. त्यामुळे दोघांच्या समन्वयाने हा प्रश्न निकाली काढायला हवा.
- अश्विनी मांजरे, पालक.
चौकट
मुंबई जिल्ह्यातील एकूण शाळा
एकूण पालिका शाळा - २५४१
उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या एकूण शाळा - १८०२