शाळा गुणवत्ता मूल्यांकन रखडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:07 IST2025-03-20T13:05:40+5:302025-03-20T13:07:20+5:30
एससीईआरटीने स्थापन केलेल्या राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षातर्फे राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजेच स्क्वॉफ तयार केला.

शाळा गुणवत्ता मूल्यांकन रखडले
मुंबई : राज्यातील शाळांच्या मूल्यांकनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे होत असलेल्या स्क्वॉफ मूल्यांकनाचे काम समाधानकारक झाले नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील फक्त ६.३० टक्के शाळांचेच मूल्यांकन पूर्ण झाले असून बोर्डाच्या परीक्षा, पेपर तपासणी आणि क्षमतावृद्धी प्रशिक्षण या कामांमधून वेळ न मिळाल्याने मूल्यांकनाच्या कामाला विलंब लागत आहे, असे शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.
एससीईआरटीने स्थापन केलेल्या राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षातर्फे राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजेच स्क्वॉफ तयार केला. या आराखड्यात शाळांनी स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी एससीईआरटीने ३ फेब्रुवारी रोजी काढलेल्या पत्रकात हे मूल्यमापन पूर्ण करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली असून स्क्वॉफसाठी १२८ निकष दिले आहेत. या निकषांबाबत सर्वंकष माहिती भरून, त्या प्रत्येक उपक्रमाचे फोटो जोडून उपक्रमाची वेगळी गुगल लिंक तयार करून ती प्रत्येक जोडायची प्रक्रिया आहे.
यासाठी एससीईआरटीने मुदतवाढ दिली. राज्यभरातील एक लाख ८ हजार ५३० शाळांपैकी ९९ हजार ४५७ शाळांनी ही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातील ६,७९६ शाळांनी स्क्वॉफ मूल्यांकन पूर्ण केले आहे. याविषयी राज्य शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
परीक्षांचे नियोजन, पर्यवेक्षण, आणि क्षमतावृद्धी प्रशिक्षण यात शिक्षक व्यस्त आहेत. आता पेपर तपासणी आणि शाळांमधील परीक्षा सुरू होतील. त्यामुळे स्क्वॉफ मूल्यांकन पूर्ण होण्याचा वेग कमीच राहणार आहे. हे मूल्यांकन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला घेतले गेले तर ते जास्त सोयीस्कर ठरले असते.
महेंद्र गणपुले, उपाध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळ