मुंबई: महापालिकांच्या शाळा म्हणजे सर्वांसमोर एक प्रतिमा तयार झाली आहे, पण येत्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या शाळेची प्रतिमा बदलणार आहे. कारण परेल- भोईवाडा, कामाठीपुरा आणि एम.एच.बी. ७ या तीन शाळांची कामे पूर्ण झाली असून, यांची बांधणी खासगी शाळांप्रमाणे करण्यात आली आहे. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात महापालिका शाळांच्या रंगरूप बदलणार असून, शाळा हायटेकही होणार आहेत. अनेक ठिकाणी महापालिका शाळांची दुरवस्था झाली आहे. वर्गदेखील नीट नाहीत. त्यामुळे अनेकदा पालक तक्रारी करतात. या सर्वाला आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शाळांच्या दुरुस्तीची, तसेच पुनर्बांधणीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. या कामांपैकी तीन शाळांच्या पुनर्बांधणीची कामे पूर्ण झाली आहेत. या शाळा पुन्हा त्याच ठिकाणी सुरू होणार असल्याने विद्यार्थी ही खूश होतील, असा विश्वास या शाळांच्या पाहणीदरम्यान शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेच्या शाळा म्हणजे महापालिकेच्या शालेय इमारतीचा रोल मॉडेल असून, भविष्यात सर्व शाळा ‘हायटेक’ करण्याबरोबरच शाळांमधील दर्जेदार शिक्षणाकरिताही पाठपुरावा करणार आहोत. त्यामुळे जनमानसातील महापालिका शाळांबद्दलचा असलेला भ्रम दूर होण्यास मदत होईल, असेही गुढेकर यांनी सांगितले. गेल्या आर्थिक वर्षात एकूण ९८ शाळेच्या इमारतींची ४११ कोटींची कामे हाती घेण्यात आली होती. यापैकी १९ कामे मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. शाळेच्या धोकादायक इमारती पाडून टाकल्यानंतर त्यांच्या पुनर्बांधणीला प्रचंड वेळ लागतो. हे काम सुरू असतानाच शाळेच्या आजूबाजूच्या अनधिकृत झोपड्या हटवण्याची मागणीही गुढेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.या शाळा आकर्षक दिसण्यासाठी त्यांना खासगी स्वरूपाच्या पद्धतीवर बनविण्यात आल्या आहेत, तसेच या शाळांचे स्वरूप कायम ठेवण्याकरिता दर तीन वर्षांनी शाळांची रंगरंगोटी करण्यावर भर देण्यात येणार आहे. महानगरपालिकेने देशात पहिल्यांदा व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे महापालिकेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण देणारी यंत्रणा राबविली आहे. (प्रतिनिधी)
शाळांची पुनर्बांधणी खासगी शाळांच्या धर्तीवर
By admin | Published: May 01, 2017 6:57 AM